टोकियो
‘टुना किंग’ नावाने प्रसिद्ध जपानचे व्यावसायिक कियोशी किमुरा यांनी नववर्षात झालेल्या लिलावात एक टूना मासा 18 लाख डॉलर्स (सुमारे 13 कोटी रुपये) मध्ये खरेदी केला आहे. कियोशी यांनी राजधानी टोकियोच्या मुख्य मासळीबाजारात रविवारी 276 किलोग्रॅमच्या टूना माशासाठी सर्वाधिक रकमेची बोली लावली आहे. कुठल्याही टूना माशासाठी आतापर्यंतची ही दुसरी सर्वात मोठी बोली आहे. कियोशी यांनीच मागील वर्षी 278 किलो वजनाचा टूना मासा 31 लाख डॉलर्समध्ये (सुमारे 22 कोटी रुपये) खरेदी केला होता.
स्वतःच्या रेस्टॉरंटमधील ग्राहकांना हा मासा खायला घालणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कियोशी यांच्या रेस्टॉरंटमध्ये जपानची विशेष थाळी शूसी मिळते, यात भातासह सागरी माशांचे खाद्यपदार्थ वाढले जातात. सागरी माशांमध्ये टूनाला जगभरात प्रचंड मागणी आहे. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडनुसार ब्ल्यूफिन टूना हा विलुप्त होणाऱया प्रजातीचा मासा आहे.
मागील वर्षी आयर्लंडच्या सागर किनाऱयावर वेस्ट कॉर्क चार्टर्ड कंपनीच्या डेव्ह एडवर्ड यांनी 23 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचा टूना मासा पकडला होता. पण त्यांनी तो परत पाण्यात सोडला होता. या माशाचे मूल्य सुमारे 23 कोटी रुपयांपेक्ष अधिक राहिले असा दावा आयरिश मिररने केला आहे. व्यावसायिक मासेमारी करत नसल्याने हा मासा पाण्यात परत सोडल्याचे एडवर्ड यांनी सांगितले आहे.