33.60 लाखाची फसवणूक केल्याचा आरोप
प्रतिनिधी/ मडगाव
जमीन विक्रीसंबंधी बनावट कागदपत्रे तयार करुन अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातलेल्या आणि सुमारे दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत असलेला आंबावली- केपे येथील प्रकाश देयकर (47) या आरोपीला न्यायालयाने जामिनावर सोडण्यासह गुरुवारी नकार देत त्याचा त्यासंबंधीचा अर्ज फेटाळून लावला.
संशयित आरोपी देयकर हा सध्या केपे पोलिसांच्या कोठडीत आहे. केपे पोलिसांनी या आरोपीला 20 ऑक्टोबर रोजी जेरबंद केले होते. केपे न्यायालयाच्या गिरीजा गावकर यांच्या न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळला.
या प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण झाला नाही. शिवाय न्यायालयात आरोपपत्रही सादर करण्यात आलेले नाही आणि म्हणून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशात म्हटलेले आहे.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक राकेशकुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रकाश देयकर हा गेल्या दोन वर्षापासून गोवा पोलिसांना गुंगारा देत होता. या आरोपीविरुद्ध क्रिमीनल ब्रिच ऑफ ट्रस्ट तसेच फसवणूक केल्याच्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या 406 आणि 420 कलमाखाली गुन्हा नोंद केलेले आहेत.
जमीन विक्री करण्याचे असल्याचे भासवून या आरोपीने अनेक लोकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा आरोप आहे. गुन्हा नोंद केल्याच्या तारखेपासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. आंबावली- केपे येथील असूनही संशयित आरोपी आपल्या कुटूंबापासून दूर राहात होता. त्याच्या मागावर असल्यामुळे आरोपी शेजारील राज्यात जाऊन लपत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. अखेर दक्ष पोलीस कर्मचाऱयांमुळे हा संशयित आरोपी पोलिसांच्या जाळय़ात सापडला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले होते.