- वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने घेतला निर्णय
ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढले आहे. रुग्ण संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व 20 जिल्ह्यांमध्ये लावण्यात आलेला कोरोना कर्फ्यू (लॉकडाऊन) 17 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
हा कर्फ्यू 10 मे रोजी सकाळी 7 ते 17 मे पर्यंत कायम असणार आहे. कोरोना कर्फ्यू यापूर्वी जम्मू काश्मीरमधील 5 जिल्ह्यात लागू होता. यामध्ये बारामुला, बडगाम, जम्मू, श्रीनगर आणि सांबा यांचा समावेश होता. आता प्रशासनाने सर्व 20 जिल्ह्यांमध्ये 17 मे पर्यंत संपूर्ण कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.
या काळात केवळ आवश्यक सेवा सुरू राहतील. यामध्ये सकाळी 6 ते सकाळी 10 या काळात किराणा मालाची दुकाने, दूध डेअरी सुरू असणार आहे. औषधांची दुकाने, पेट्रोल पंप दिवसभर सुरु असणार आहेत. तसेच लग्न समारंभामध्ये केवळ 25 लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- मागील 24 तासात 5 हजार पेक्षा अधिक नवे रुग्ण
रविवारी 5,190 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा 2 लाख 16 हजार 932 वर पोहोचला असून त्यातील 1 लाख 64 हजार 958 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 49 हजार 248 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 2726 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.