तीन वाहनांची धडक, महामार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली
प्रतिनिधी / जयसिंगपूर
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर हद्दीत ट्रक, टेंम्पो आणि कार यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात दादासो जबो सुल्तान्नावर (वय 38 रा, पट्टणकुडी चिकोडी कर्नाटक) हे टेम्पो चालक गाडीतच अडकून पडल्याने जागीच ठार झाले तर कारमधील तिघे जखमी झाले. जखमींना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विचित्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास खोळंबून पडली होती. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूरहून आयशर टेम्पो व त्याच्या पाठोपाठ इsिंडका कार जयसिंगपूरच्या दिशेने जात होती. याचवेळी मालवाहू ट्रक जयसिंगपूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. यावेळी समोरून भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणारा टेंम्पो आणी ट्रकची समोरासमोर धडक झाली. त्याचवेळी मागून भरधाव येणारी इडिका कार टेम्पोच्या मागील बाजूस जोराने धडकली. त्यामुळे टेंम्पोतील चालक दादासो सुल्तान्नावर हे टेंम्पोत अडकून जागीच ठार झाले. तर कारमधील श्रीनिवास चंद्रकांत कंबळे, प्रशांत महादेव डांगे, अर्शन मुक्तार अहमद पटेल हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. चालकाचा मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेतून प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या तिहेरी अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.