चेन्नई-बेंगळूर / वृत्तसंस्था
माजी विश्व बुद्धिबळ चॅम्पियन विश्वनाथन आनंद अखेर शनिवारी भारतात दाखल झाला. कोव्हिड-19 च्या महासंकटात लॉकडाऊन जाहीर केले गेले, त्यावेळी जर्मनीत अडकलेल्या आनंदला तब्बल तीन महिने तेथेच थांबावे लागले होते.
पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे विश्वनाथन आनंद बुंदेस्लिगा बुद्धिबळ लीग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फेब्रुवारीत जर्मनीला दाखल झाला. ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर तो मार्चमध्ये भारतात परतणार होता. पण, कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे अचानक सारी समीकरणे बिघडून गेली आणि अवघ्या जागतिक स्तरावरील हालचालींना मोठा ब्रेक लागला.
चेन्नईस्थित बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंद एअर इंडियाच्या फ्लाईटने प्रँकफर्टवरुन दिल्लीमार्गे मायदेशी आला आणि त्यानंतर दुपारी 1.15 च्या सुमारास बेंगळुरातील केम्पेगौडा विमानतळावर पोहोचला. आनंद बेंगळुरात पोहोचल्याच्या वृत्ताला त्याची पत्नी अरुणा आनंदने दुजोरा दिला. तिने दिलेल्या माहितीनुसार, आनंद ठीक आहे आणि मायदेशी पोहोचल्याचा त्याला विशेष आनंद आहे.
‘प्रदीर्घ कालावधीनंतर आनंद परतल्यानंतर आम्हाला देखील अर्थातच दिलासा लाभला. तो क्वारन्टाईनची रितसर प्रक्रिया पूर्ण करेल आणि त्यानंतर शिष्टाचाराप्रमाणे चेन्नईत दाखल होईल’, असे अरुणा आनंद यांनी यापूर्वी म्हटले होते.
सध्याच्या दिशानिर्देशानुसार, आनंद कर्नाटकात दाखल झाल्यानंतर कोव्हिड चाचणी अहवाल निगेटिव्ह येईतोवर 7 दिवस संस्थांत्मक विलगीकरणात असेल आणि त्यानंतर पुढील 14 दिवस होम क्वारन्टाईन असणार आहे, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी नमूद केले. आनंद शुक्रवारी रात्री प्रँकफर्टहून निघाला आणि शनिवारी दुपारी बेंगळूरमध्ये पोहोचला. सध्या जर्मनीतून निघणाऱया फ्लाईटस्ना भारतात फक्त दिल्ली व बेंगळूर या दोनच ठिकाणी उतरता येते.
आपल्या जर्मनीतील वास्तव्यात आनंद प्रँकफर्टनजीक राहत होता. त्याने रशियातील कॅन्डिडेटस स्पर्धेसाठी ऑनलाईन समालोचन देखील केले. पण, नंतर ती स्पर्धा देखील मध्यातच रद्द केली गेली. पुढे आनंदने या महिन्याच्या प्रारंभी ऑनलाईन नेशन्स चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. जर्मनीतील वास्तव्यादरम्यान आनंद व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून सातत्याने आपल्या कुटुंबियांशी संपर्कात राहिला आणि याशिवाय, त्याने बुद्धिबळविषयक उपक्रमात स्वतःला व्यस्त ठेवले.