इदलहोंड गावावर शोककळा : मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांसह पोलिसांनी दिली मानवंदना : अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर
वार्ताहर /अगसगे
राजस्थानमधील मद्रास रेजिमेंटच्या बारमेर मिलिटरी कॅम्पमध्ये कार्यरत असलेल्या इदलहोंड (ता. बेळगाव) येथील बाळाप्पा तानाजी मोहिते (वय 32) या जवानाचा शुक्रवारी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्यावर सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी गावातील सर्व रस्ते फुलांनी, रांगोळय़ांनी व पोस्टर्सनी सजविले होते. श्रद्धांजलीचे फलक अगसगेपासून इदलहोंड गावापर्यंत लावण्यात आले होते. मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. तर पोलीस खात्याने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी अनेकांच्या डोळय़ांत अश्रू तरळत होते.
इदलहोंड येथील बाळाप्पा तानाजी मोहिते (वय 32) यांचा शुक्रवार दि. 31 डिसेंबर रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव राजस्थान येथून बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री येथे रविवारी रात्री उशिरा आणण्यात आले.
सोमवारी सकाळी 9 वाजता मराठा लाईट इन्फंट्रीमधून पार्थिव इदलहोंडला मिरवणुकीने आणण्यात आले. यावेळी अगसगे, हंदिगनूर, बोडकेनट्टी, कुरिहाळ, निंग्यानट्टी, शिवापूर, इदलहोंड ग्रामस्थांतर्फे तसेच शाळा, कॉलेज व माजी सैनिकांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. इदलहोंड येथे उभारण्यात आलेल्या मंडपात दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. पार्थिव गावात दाखल होताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. इदलहोंडसह आजूबाजूच्या गावांतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी काकती पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
अगसगे ते इदलहोंडपर्यंत असलेल्या गावांतील नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. ‘अमर रहे अमर रहे, बाळाप्पा मोहिते अमर रहे’ अशा घोषनांनी श्रद्धांजली वाहिली. काकतीचे उपतहसीलदार राकेश बुवा, महसूल खाते आणि काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ आय. एस. यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
दुपारी दीड वाजता जवानाच्या शेतामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीमाभागातील गावांसह महाराष्ट्रातील राजगोळी, कोवाड, कुदनूर, तिरमाळसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, ग्राम पंचायत सदस्य, तालुका पंचायत सदस्य, नेतेमंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती.
अगसगे गावावरही शेककळा
जवान बाळाप्पा तानाजी मोहिते यांचे शिक्षण अगसगे गावातील शाळेमध्ये पाचवीपासून दहावीपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण बेळगाव येथे घेतले. शिक्षणानंतर ते मद्रास रेजिमेंटमध्ये देशसेवेसाठी दाखल झाले. तेरा वर्षे सेवा बजावली आहे. अगसगे गावात शिक्षण घेतल्यामुळे गावात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यामुळे गावातील सर्व दुकाने बंद ठेवून गावच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि ग्राम पंचायतीच्यावतीने विविध मान्यवरांनी मानवंदना दिली.