प्रतिनिधी / बेळगाव
फुलबाग गल्ली येथील किरण पाटील यांच्या घरी आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरातील सर्वच सामान बेचिराख झाले. या संदर्भातील बातमी वृत्तपत्र आणि समाजमाध्यमातून समजल्यानंतर लागलीच जायंट्स सखीच्या पदाधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली आणि कुटुंबाची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा चंदा चोपडे, विद्या सरनोबत, लता कंग्राळकर, अर्चना पाटील उपस्थित होत्या. जायंट्स सखीच्या अनेक सदस्यांनी या कुटुंबासाठी भरीव मदत करण्याचे ठरविले.
कुणी भांडी, कुणी अंथरुण-पांघरुण, कुणी घरात लागणारे संपूर्ण किराणा सामान, कुणी तिखट-मीठ, तेल, तर कुणी स्वयंपाक करण्यासाठी लागणारी गॅस शेगडी, कपडे, टब-बादली आणि बरेच काही सामान दिले. अशाप्रकारे त्यांचा बेचिराख झालेला संसार उभारण्याचा प्रयत्न केला.
मदतीचे कौतुक
लागलीच हे साहित्य घेऊन त्यांनी या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. सातत्याने समाजात असे काही प्रसंग उद्भवले तर नेहमीच मदतीचा हात पुढे करणाऱया जायंट्स सखीने आज केलेल्या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी अनुपमा कोकणे, लता कंग्राळकर, शीतल नेसरीकर, सुवर्णा काळे, ज्योती सांगुकर व सदस्या उपस्थित होत्या.