विमा पॉलिसी संदर्भात साधी-सोपी माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इन्शुरन्स रेग्युलेटर इरडाने इन्शुरन्स कंपन्यांच्या जाहिरातीसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे विमा पॉलिसी जाहिरातीमध्ये अनावश्यक प्रकारचे दावे करण्यावर येत्या काळात निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने काही विमा कंपन्या सद्यस्थितीमधील योजनेची माहिती विविध अंगांनी फुलवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा बाबांवर बंदी आणण्याचा विचार चालवला जात आहे.
इरडाने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण नियमन 2020 च्या ड्राफ्टनुसार यामध्ये अनुचित आणि विमा ग्राहकांना गेंधळात टाकणाऱया जाहिरातीवर बंदी लावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे तर जाहिरातीसंदर्भात स्पष्ट स्वरुपात माहिती देण्यावर भर दिल्यासच ती प्रसिद्ध करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवीन नियमावलीसाठी इरडाची नवीन जाहिरात नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी हितचिंतकांकडून 10 नोव्हेंबरपर्यंत सूचना मागविण्यात येणार आहेत. याच्या आधारे विमा कंपन्यांना जाहिराती प्रसिद्ध करण्याविषयी मार्गसूची तयार केली जाणार आहे. जाहिरात सोपी भाषा वापरुन तयार करावी व प्रसिद्धी करावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.