मनपाला चार वर्षांपासून उत्पन्न नाही
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे राज्य शासनाकडून कोणतेच अनुदान मंजूर झाले नाही. अशातच होर्डिंग आणि विविध माध्यमातून मिळणारा महसूल देखील बंद आहे. त्यामुळे महसूल उत्पन्नासाठी महापालिकेने जाहिरात फलक लावण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. मात्र चौथ्यांदा या निविदाना प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी महापालिकेचे उत्पन्न घटले आहे.
जाहिरात फलक आणि भूभाडे या माध्यमातून महापालिकेला वर्षाला 50 लाखांचा महसूल मिळत होता. मात्र प्लास्टिक बंदी अंतर्गत फ्लेक्सचे होर्डिंग लावण्यावर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे मध्यंतरी होर्डिंगच्या निविदा काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला 4 वर्षांपासून जाहिरात फलकाच्या माध्यमातून मिळणाऱया उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे मनपाची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून मिळणारा महसूल स्वच्छता आणि विविध कामांसाठी खर्च केला जातो. त्यामुळे विकासकामे राबविण्यासाठी निधी शिल्लक रहात नाही. तसेच दोन वर्षात केवळ 15 व्या वित्तआयोगातून अनुदान मंजूर झाले आहे. राज्य शासनाकडून कोणतेच अनुदान मंजूर झाले नाही.
एसएफसी अनुदान तसेच विविध योजनेंतर्गत महापालिकेला अनुदान देण्यात येत होते. तसेच सर्वसामान्य आणि गरजूंकरिता राबविण्यात येणाऱया सरकारी योजनांसाठी निधी मंजूर करण्यात येत होता. मात्र यापैकी कोणतेच अनुदान राज्य शासनाने दिले नाही. शासनाकडून निधी मिळत नसल्याने उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून महापालिकेने जाहिरात फलक लावण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. यापूर्वी तीनवेळा निविदा मागविल्या होत्या. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चौथ्यांदा निविदा काढून देखील प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी महापालिकेचे उत्पन्न बंद झाले आहे. जाहिरात फलकांसह पार्किंग शुल्क आकारणी आणि बसथांब्यांवर जाहिरात फलक लावणे, डिजिटल फलकांवर जाहिराती प्रसिद्ध करणे, स्मार्ट बसथांब्यांवरील डिजिटल फलकावर जाहिराती लावणे अशा विविध निविदा काढण्यात आल्या होत्या. पण यापैकी कोणत्याच निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेने निश्चित केलेली निविदेची रक्कम जास्त असल्याने निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभत नसल्याचे निदर्शनास आले आहे.