शहरातील 174 पोलिओ केंद्रांवर लसीकरण केले जाणार : एकाच दिवशी 42 हजार बालकांना लसीचे उद्दिष्ट
प्रतिनिधी /बेळगाव
पोलिओ लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने रोटरी क्लबतर्फे शुक्रवारी सायंकाळी शहरातून जागृती फेरी काढण्यात आली. रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी होणाऱया पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन पोलिओमुक्त देशासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन फेरीवेळी करण्यात आले. आरोग्य विभाग व रोटरी क्लबच्या सदस्यांनी एकत्रितपणे या जागृती फेरीत सहभाग घेतला.
रविवारी बेळगाव शहरातील 174 पोलिओ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. एकाच दिवशी 42 हजार बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य खात्याने ठेवले आहे. रोटरीच्या प्रयत्नांमुळेच देश पोलिओमुक्त झाला असल्याचे रोटरीतर्फे सांगण्यात आले.
धर्मवीर संभाजी चौकापासून जागृती फेरी काढण्यात आली. यामध्ये रोटरीच्या विविध क्लबसह इनरव्हीलचे सदस्य सहभागी झाले होते. आरोग्य विभागाचे अधिकारी व आशा कार्यकर्त्या यांनी नागरिकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस घेण्याचे आवाहन केले. मारूती गल्ली, गणपत गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड या परिसरातून ही जागृती फेरी काढण्यात आली.