सातारा : साताऱ्यातील जिल्हा सत्र न्यायालयानजीक असलेल्या ओढ्यात भरधाव वेगातील कार 30 फूट खोल खड्डयात कोसळली. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात कोल्हापूरचे 2 जण ठार झाले तर एक जण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनिकेत कुलकर्णी (वय 23, रा. मंगळवार पेठ) आणि आदित्य घाटगे (वय 23, रा. कसबा बावडा, दोघे रा. कोल्हापूर) अशी अपघात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर देवराज माळी (वय 21, रा. कसबा बावडा) असे जखमी युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथील युवकांची भरधाव वेगातील कार पोवई नाक्यावरून कोरेगावच्या दिशेने जात होती. जिल्हा सत्र न्यायालयानजीक कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार 30 फूट खोल ओढ्यात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि रिक्षाचालकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना ओढ्यातून बाहेर काढले. या अपघातात 2 जण ठार झाले असून, 1 जण गंभीर जखमी आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.