प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा पंचायतीच्या विविध स्थायी समित्यांची निवडणूक गुरुवार दि. 4 रोजी होणार होती. मात्र, मंगळवारी बेळगाव जिल्हय़ात कोरोनाचे नव्याने 51 रुग्ण आढळल्याने ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळल्याने संपूर्ण जिल्हय़ात 15 कंटेन्मेंट झोन निर्माण करण्यात आले आहेत. यामुळे त्या भागातील जिल्हा पंचायत सदस्यांना निवडणुकीत हजर राहता येणार नसल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी दिली.
गुरुवारी जिल्हा पंचायतीच्या शिक्षण व आरोग्य स्थायी समिती, सामाजिक व न्याय स्थायी समिती, कृषी व औद्योगिक स्थायी समिती अध्यक्ष व सदस्य तर अर्थ व कर स्थायी समिती तसेच सामान्य स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक दि. 4 रोजी घोषित करण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे ही निवडणूक पार पडेल का असा प्रश्न निर्माण झाला होता. मंगळवारी जिल्हय़ात 51 रुग्ण आढळल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समितीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे, असे डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले. मात्र, यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुक सदस्यांचा हिरमोड झाला आहे.