सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात पोलिसांनी विविध तीन ठिकाणी जुगार, मटका अड्डय़ावर छापे टाकून आठ जणांवर कारवाई केली. या सर्वांकडून जुगाराचे साहित्य व 8 हजार 812 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये साताऱ्यात दोघांना अटक करण्यात आली असून, बाकीच्या सहाजणांना सीआरपीसी अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांना दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सदरबझार परिसरातील एस. टी. कॉलनीत असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाने मटका व्यवसाय चालवणाऱ्या अक्षय आराम वाघमारे (वय 24, रा. जगतापवाडी, शाहूनगर, गोडोली, सातारा) व शंकर संभाजी सुर्वे (वय 38 रा. रविवार पेठ, सातारा) व शाहरुख काझी, (रा. कोरेगाव) या तिघांवर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातील 2 हजार 410 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले असून अक्षय वाघमारे व शंकर सुर्वे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
तसेच लोणंद पोलिसांनी खंडाळा तालुक्यातील दापकेघर गावच्या हद्दीतील चौघांवर तर कराड शहर पोलिसांनी शहरातील मच्छी मार्केटमधील मोकळ्या जागेत मटका व्यवसाय करणाऱ्या एकावर कारवाई केली.