टाळय़ा वाजवून डॉक्टरांनी दिला निरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील कोरोनाचा पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्याची स्वॅब तपासणी निगेटिव्ह आल्याने त्याला शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षातून घरी जाऊ देण्यात आले. यावेळी त्याच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी टाळय़ा वाजवून त्याला निरोप दिला.
जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. बेळगुंदी येथील 70 वषीय वृद्ध पूर्णपणे बरा झाला आहे. शासकीय नियमानुसार शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून त्याला घरी पाठविण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
3 एप्रिल रोजी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगाव येथील तिघांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये कॅम्प व हिरेबागेवाडी येथील दोन तरुण व बेळगुंदी येथील 70 वर्षीय वृद्धाचा समावेश होता. रुग्ण क्रमांक 126 असा या वृद्धाचा क्रमांक होता.
प्रत्यक्षात 1 एप्रिलपासूनच या वृद्धावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत होते. त्याच्या प्रकृतीत झालेली सुधारणा व स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला शनिवारी घरी पाठविण्यात आले. विलगीकरण कक्षाबाहेर त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी टाळय़ा वाजवून त्याचे अभिनंदन केले. यावेळी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी, जिल्हा सर्जन डॉ. हुसेनसाब काजी आदी उपस्थित होते.
सरकारी रुग्णवाहिकेतून या वृद्धाला घरी पाठवून दिले. तत्पूर्वी डॉक्टरांनी त्याला घरात कोणती खबरदारी घ्यायची, पथ्यपाणी कसे पाळायचे, याचा सल्ला दिला. वृद्ध व लहान मुलांना कोरोनाची लागण झाली तर ते धोकादायक असे सांगतात. मात्र, बेळगाव जिल्हय़ातील हा पहिला रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. उर्वरित बाधितांवरही उपचार सुरू असून त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे.