प्रतिनिधी /रत्नागिरी :
जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असणाऱया दापोली तालुक्यातील हर्णै येथील 64 वर्षीय वृद्धाचा गुरूवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबळींची संख्या 59 झाली आहे. बुधवार सायंकाळपासूनच्या 24 तासात 54 नवे रूग्ण आढळल्याने बाधीतांची संख्या 1746 झाली आहे.
पॉझीटीव्ह अहवाल आलेल्या रूग्णांमध्ये रत्नागिरी 21, कामथे 11, कळंबणी 17, दापोली 3, रायपाटण 1 व लांजा येथील एकाचा समावेश आहे. गुरूवारी 36 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1169 झाली आहे. यात समाजकल्याण रत्नागिरी 4, पेढांबे 29, माटे हॉल येथील तिघांचा समावेश आहे.
दापोलीतील 12 वा बळी
दापोली तालुक्यातील हर्णै येथील 64 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 59 झाली आहे. दापोली तालुक्यातील हा 12 वा बळी आहे.
375 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 17 हजार 408 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 1746 अहवाल पॉजिटीव्ह तर 15 हजार 275 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 375 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
खेडमध्ये अग्नीशमन कर्मचाऱयासह कुटुंब बाधीत
खेडमधील नगरपरिषदेच्या अग्निशमक बंबावरील कर्मचाऱयासह कुटुंबातील 5जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच भरणे येथील 5, फुरूस 2, लोटे 4 व देवघर येथील एक वरील 5 असे एकूण 17 नवे रूग्ण आढळले आहेत. शहरातील समर्थ नगर परिसरात पुन्हा कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून याठिकाणी जाणारे सर्व मार्ग अडवण्यात आले आहे. भरणे येथील पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांच्या वास्तव्याचा परिसर सील करण्यात आला आहे.
दापोलीत तीन पॉझिटिव्ह
दापोली गुरूवारी सकाळी तीनजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात पाचपंढरी, दापोली व जामगेतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
राजापूरात आणखी एक पॉझिटीव्ह
राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथील एका 28 वर्षीय तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या 70 झाली आहे. 58 जण बरे होवून घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 4 जणांचा मृत्यु झाला आहे.