32 ठिकाणी सार्वजनिक गणपती : गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा – जिल्हाधिकारी
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर आला असताना गणेशोत्सवावर कोरोना आणि पावसाचे सावट असूनसुद्धा गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीची लगबग सर्वत्र सुरू आहे. सिंधुदुर्गात तब्बल 68 हजार 68 एवढे घरगुती गणपती आणि 32 सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत.
22 ऑगस्टला गणेश चतुर्थी असून त्या दिवसापासून दीड, पाच दिवसांपासून साधारणपणे 11 ते 21 दिवसांपर्यंत गणेशोत्सव चालतो. कोकणातील गणेशोत्सव सण हा सर्वात मोठा सण असतो. त्यामुळे कामानिमित्त जिल्हय़ाबाहेर देशाच्या कानाकोपऱयात असलेले चाकरमानी जिल्हय़ात येतात. कोकणात सार्वजनिक गणपतीपेक्षा घरगुती गणपतीच अधिक असतात. यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने राज्य शासनाने काही निर्बंध घातले असून कमीत कमी दिवस, गर्दी टाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
40 हजार चाकरमानी दाखल
गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातले गेल्याने 1 ते 20 ऑगस्टपर्यंत सुमारे 40 हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. सुमारे एक लाखावर चाकरमानी येतील, असे अपेक्षित होते. मात्र कोरोना संकटामुळे अनेक चाकरमान्यांनी गणेशोत्सवाला येण्याचे टाळले. तसेच 2 मे ते 20 ऑगस्ट 2020 या साडेचार महिन्यांच्या कालावधीत दोन लाख चाकरमानी जिल्हय़ात आले. त्यातील निम्याहून अधिक चाकरमानी परत गेलेले नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांचा ओघ आता मंदावलेला दिसत आहे.
गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग
गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा, असे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र जसजसा गणेशोत्सव जवळ येत आहे तसतसा गणेशोत्सवाचा उत्साह वाढत आहे. सर्व गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त आहेत. सर्व बाजारपेठा सजल्या असून गर्दीही दिसून येत आहे.
जिल्हय़ात 32 सार्वजनिक गणपती
दरवर्षी 33 सार्वजनिक गणपती असतात. मात्र यावर्षी आंबडपाल कॉलनी येथील एक गणपती कमी झाल्याने 32 सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत. यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील पाच, सावंतवाडी सात, वेंगुर्ले तीन, कुडाळ चार, कणकवली पाच, मालवण तीन, देवगड एक आणि वैभववाडी चार अशी सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या आहे.
सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
गणेशोत्सवासाठी जिल्हय़ाबाहेरून येणाऱया गणेशभक्तांना येणाऱया अडचणी निवारणासाठी सर्व चेकपोस्टवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय नांदगाव, कासार्डे व कणकवली या ठिकाणी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी पोलीस गस्त सुरू ठेवली जाणार आहे. किनारपट्टी भागातही पोलीस गस्त सुरू राहणार आहे. तसेच सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्पष्ट केले.
साधेपणात गणेशोत्सव साजरा करा – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण असला तरी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन जिल्हावासियांनी साधेपणातच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी करणे टाळावे. गणपती आगमन व विसर्जनावेळी मिरवणुका काढू नयेत. कमीत कमी दिवसांचा गणेशोत्सव साजरा करावा. आरत्या, भजने, फुगडय़ा घरच्या घरी करव्यात. पूजा, वसा, गौरी गणपतीच्यावेळी गर्दी टाळावी. पुरोहितांना न बोलावता स्वत: पूजा करावी. नियमांचे पालन करून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा आणि कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.