कराडनंतर फलटण, कोरेगाव चोऱया वाढू लागल्या
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील विविध तालुक्यात घरफोडी व जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. कोरेगाव येथे घरफोडी करून 2 लाख 7 हजाराचा मुद्देमाल, फलटण येथेही घरफोडी करून 6 लाख 12 हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. तरडगाव येथे ही जबरी चोरी करून 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनामुळे जिह्यात चांगली खळबळ माजली आहे. एकीकडे अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरू असताना घरफोडय़ांच्या वाढत्या घटना नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करत आहेत.
स्वयंपाक घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले 2 लाखांचे सोने लंपास
चिमणगाव(ता. कोरेगाव) येथील आटाळी शिवारात संदीप तानाजी जाधव (वय 45) हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. रविवार दि. 13 रोजी संदीप हे घराच्या दरवाज्याची कडी न लावता झोपले. यांचा फायदा घेत अज्ञाताने मध्यरात्री घरात प्रवेश करत दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. या चोरीची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध तक्रार दाखल झाली आहे.
शेतकरी संदीप जाधव यांच्या घरी रविवारी मध्यरात्री अज्ञाताने प्रवेश केला. यावेळी घरातील सर्व सदस्य झोपलेले होते. यांचा फायदा घेत घरातील समान अस्थाव्यस्थ केले. स्वयंपाक घरात ठेवलेली सुटकेस या अज्ञाताच्या निदर्शनास आली. त्याने ती सुटकेस उघडली. या सुटकेसमध्ये 22 हजार रोख रक्कम, 2 तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार, 2 तोळे वजनाची मोहनमाळ, 1/2 तोळे वजनाचे मणीमंगळसुत्र, मोबाईल असे दागिने ठेवलेले होते. हे दागिने घेऊन अज्ञाताने पोबारा केला. घरात चोरी झाल्याचे संदीप जाधव यांनी कोरेगाव पोलिसांना कळविले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. अज्ञाताविरूद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम तपास करत आहेत.
फलटण शहरात घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
फलटण शहरातील विद्यानगर भागातील बंद घर फोडून चोरटय़ांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. या चोरी विरूद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटणमधील विद्यानगर भागात रूपाली धीरज कचरे (वय 32) या राहत आहेत. त्या बाहेरगावी गेल्या होत्या. तोच दुसऱया दिवशीच्या मध्यरात्री अज्ञाताने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील साहित्य अस्थाव्यस्थ करून कपाटात ठेवलेले तीन तोळे वजनाचे मंगळसुत्र, दोन तोळयाचे मिनीगंठण, तीन तोळ्याचा हार, पाच तोळयाच्या तीन अंगठय़ा, एक तोळ्याची ठुशी, अडीच तोळ्याच्या दोन चेन, दोन तोळ्याचे मनी मंगळसुत्र, दीड तोळ्याच्या दोन अंगठय़ा, दोन तोळ्याची बांगडी, अर्धा किलो चांदीची वस्तू, 50 हजार रूपये रोख रक्कम असा एकूण 6 लाख 12 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अज्ञाताविरूद्ध रूपाली यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक केनेकर करत आहेत.
तरडगावात चाकूचा धाक दाखवत वृद्धेला लुटले
तरडगाव (ता. फलटण) येथे राहत असलेल्या 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात दोन अज्ञात इसम जबरदस्ती घुसले. त्यांनी वृद्धेला चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व पैसे चोरून नेले. विमल विलास गायकवाड असे त्याचे नाव आहे. या अज्ञाताविरूद्ध लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विमल गायकवाड या तरडगाव येथील राहत्या घरी बसल्या होत्या. यावेळी मोटार सायकलवरून दोन अनोळखी इसम आले. हे पाहून विमल या घराबाहेर आल्या. तोच या इसमांनी जबरदस्ती घरात प्रवेश केला. विमल या आरडाओरडा करू लागल्याने इसमांनी चाकुचा धाक दाखविला. आणि घरात ठेवलेले दीड तोळयाचे मणीमंगळसुत्र, 3 ग्रॅमची कानातील फुले, सोन्याची नथ, व पैसे असा 38 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. तोच विमल यांनी लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.