कुळे दूधसागर नदीवरील प्रकार
प्रतिनिधी /धारबांदोडा
दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी जीपगाडीतून नदी ओलांडण्याचे फाजील धाडस दिल्लीच्या पाच युवा पर्यटकांच्या अंगलट आले. येथील दृष्टीचे जीवरक्षक व स्थानिकांच्या मदतीने पाण्याच्या प्रवाहात अडकलेली त्यांची जीप बाहेर काढावी लागली. बुधवारी दुपारी ही घटना घडली.
दिल्लीहून आलेल्या या पाच पर्यटकांनी गुगल मॅपच्या आधारे महिंद्रा थार जीप पाण्यात उतरवली खरी, पण पाण्याच्या प्रवाहात ती एकाच जागी अडकून पडली. ती पाण्यातून बाहेर काढण्यासाठी तेथील जीवरक्षक व काही स्थानिकांची मदत घ्यावी लागली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील पाच पर्यटक दूधसागर धबधबा पाहण्यासाठी म्हापसाहून जीए -03-डब्ल्य़ू-3070 या क्रमांकाची महिंद्रा थार जीप घेऊन कुळे येथे आले होते. धबधब्यावर जाण्यासाठी वाटेत दोन ठिकाणी नदीचा प्रवाह ओलांडावा लागतो. त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता जीप थेट पाण्यात उतरवली. सध्या दूधसागर पर्यटन व्यवसाय बंद असून पर्यटकांच्या या कृतीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोणतेही खासगी वाहन घेऊन थेट दूधसागर धबधब्यावर जाता येत नाही. दूधसागर हंगाम सुरु झाल्यानंतर परवानाधारक जीपगाडय़ाच पर्यटकांना धबधब्यापर्यंत नेऊ शकतात.