नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय स्तरावर जुलै अखेरपर्यंत होणाऱया सर्व टेबलटेनिस स्पर्धा व इव्हेंटस रद्द करत असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस संघटनेने शनिवारी केली. जागतिक स्तरावर कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऑगस्टपासून काही टेटे स्पर्धांना सुरुवात होऊ शकेल. पण, त्या स्पर्धांच्या खर्चात देखील कमालीची कपात करावी लागेल, असे संकेत त्यांनी येथे दिले.
प्रत्येक हंगामात ज्येष्ठ टेबलटेनिसपटूंसाठी स्वतंत्र स्पर्धा होतात. टेबलटेनिस एक्स इव्हेंटही होत असतात. आर्थिक आव्हाने पेलण्यासाठी, त्यांना सामोरे जाण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा पूर्णच रद्द कराव्या लागत आहेत, असे जागतिक संघटनेने येथे नमूद केले. विविध स्पर्धांसाठी होणाऱया खर्चात कशा प्रकारे कपात करता येईल, याकडे लक्ष पुरवण्याची सूचना यापूर्वीच केली आहे. 2020 मधील आर्थिक संकट अभूतपूर्व आहे. त्यामुळे, काटेकोर नियोजनावर भर देण्याची गरज आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.