वृत्तसंस्था/ टोकिओ
चीनमधील अलिबाबा कंपनीचे प्रसिद्ध उद्योगपती जॅक मा यांनी जपानच्या सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. जपानी टेक्नालॉजी कंपनीच्या कार्यालयीन करार व अन्य उद्योग तसेच वीवर्क यासारख्या जोखिमपूर्ण असणाऱया गुंतवणूकीसोबत संघर्षाची स्थिती निर्माण झाल्यामुळे मा यांनी राजीनामा दिला आहे.
टोकिओची मूळची असणाऱया सॉफ्टबँकने आर्थिक अहवाल सादर कण्याच्या अगोदरच सोमवारी जॅक मा यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. सॉफ्टबँकेने संचालक मंडळावर तीन नवीन सदस्यांची घोषणा केली आहे, यामध्ये सॉफ्टबँकेचे मुख्य आर्थिक अधिकारी योशिमित्सु गोटो आणि वासेदा विद्यापीठाचे प्राध्यापक युको क्वामोटो यांचाही समावेश आहे. तसेच अलीबाबाने सॉफ्टबँकेत भरपूर प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
जॅक मा यांनी 2007 मध्ये सॉफ्टबँकेच्या संचालक मंडळात प्रवेश केला होता आणि सॉफ्टबँकेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी मासायेशी सेन यांच्यासोबत त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध आहेत.