पार्किंगची सोय केल्यानंतरच कामाला सुरुवात करा
प्रतिनिधी/ बेळगाव
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात न्यायालयीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या इमारतीमध्ये पार्किंगची सोय करावी, यासाठी वकिलांनी चार दिवसांपूर्वी काम थांबविले होते. पुन्हा हे काम सुरू करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केला असता वकिलांनी त्याला सक्त ताकीद देऊन काम थांबविण्याची सूचना केली आहे.
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. वाहनांची संख्या वाढत चालल्यामुळे या आवारात मोठय़ा प्रमाणात पार्किंग होत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या इमारतीत अनेक न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. त्यांची संख्याही अधिक असल्यामुळे पार्किंगसाठी मोठय़ा जागेची गरज आहे.
जेएमएफसी न्यायालयाच्या इमारतीला लागूनच नवीन भव्य अशी इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीच्या कामकाजाला सुरुवात करताना वकिलांनी त्या इमारतीमध्ये पार्किंगची सोय करावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी आश्वासन देण्यात आले होते. मात्र काम सुरू केल्यानंतर त्यामध्ये पार्किंगची सोयच करण्यात आली नसल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी काम बंद पाडण्यात आले. मात्र, सोमवारी पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. याची माहिती वकिलांना मिळताच त्यांनी ते काम थांबविले आहे.