मराठी साहित्य, गझलविश्वावर शोककळा
विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त
वार्ताहर / तळेरे:
मराठी गझलविश्वातील ज्येष्ठ गझलकार, अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मधुसुदन नानिवडेकर (58) यांचे रविवारी पहाटे 3.30 च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने तळेरे-बाजारपेठेतील निवासस्थानी निधन झाले. मूळचे नानिवडे-वैभववाडी येथील नानिवडेकर यांनी नानिवडे गावचे सरपंचपदही भूषविले होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्स्फूर्त कवी, गझल विश्वातील प्रेमाचा शायर काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी व्यक्त केली.
नानिवडेकर यांना पहाटेच्या सुमारास अत्यवस्थ वाटू लागले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळच्या सुमारास नानिवडे या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
मराठी साहित्य क्षेत्रातील विशेषत: गझलक्षेत्रातील नामवंत व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या नानिवडेकर यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीने साहित्य व गझल क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत रसिकांच्या मनावर अधिराज्य मिळविले होते. मनाने दिलदार, हळव्या आणि गोड वाणीने ते सर्वांना आपलेसे करत. समोरच्या व्यक्तीला न दुखवणारे, नेहमी हसतमुखाने, आनंदाने, सकारात्मक विचाराने, आत्मियतेने भरभरून बोलणारे नानिवडेकर म्हणजे साहित्य क्षेत्रात अत्यंत इमानदारीने व प्रामाणिकपणे वावरणारी व साधेसरळ, सोपे आयुष्य जगणारी अशी हस्ती होती.
गझल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
गझल क्षेत्रातील त्यांची कामगिरी मराठी साहित्य वर्तुळासाठी लक्षवेधी ठरली आहे. पं. भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या अनेक गझला गायिल्या आहेत. पांचाळे हे नानिवडेकर यांचा ‘प्रेमाचे शायर’ असा उल्लेख करीत. त्यांची ‘भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस’ ही गझल विशेष प्रसिद्ध आहे. वाशी येथे 2017 साली झालेल्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये त्यांनी गझल सादरीकरण केले होते.
अनेक पुरस्कारांनी गौरव
महाराष्ट्र टाईम्ससाठी ते पत्रकारिता करत. साहित्य व पत्रकारितेतील वाटचालीत अनेक पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. अलिकडेच चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचनालयाचा द्वारकानाथ शेंडे विशेष साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट साहित्यिक पत्रकार पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते. ते सिंधुभूमी कला अकादमीचे संचालक होते. ‘चांदणे नदीपात्रात’ हा त्यांचा प्रकाशित झालेला काव्यसंग्रह. कित्येकांच्या पुस्तक, काव्यसंग्रहांना त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
सरपंचपदीही विराजमान
नानिवडे गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ कामगिरी बजावली होती. खारेपाटण येथे काही काळ वस्तीला होते. त्यानंतर वर्षभरापूर्वीपासून ते तळेरे बाजारपेठेत कुटुंबासह राहत होते. त्यांच्या जाण्याने एका प्रतिभावंत साहित्यिकाला आपण मुकल्याची भावना साहित्य वर्तुळासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावरील फेमस गझलकार
नानिवडेकर हे फेसबुक, व्हॉट्सऍप आदी सोशल मीडियावरही सक्रिय असायचे. फेसबुकवर त्यांच्या गझलेच्या ओळी वाचणे म्हणजे फेसबुकमित्रांसाठी जणू पर्वणीच असायची.
मी केली कधी न माझ्या वेदनांची रोषणाई
मी दिवाळी सोसण्याची साजरी साधीच केली
घावही त्यांनीच केले
दंशही त्यांनीच केले
शेवटी श्रद्धांजलीची
भाषणे त्यांनीच केली
चार दिवसांपूर्वी फेसबुकवर अपलोड केलेल्या या त्यांच्या गझलेच्या ओळी आता मात्र सर्वांच्याच मनाला चटका लावणाऱया ठरल्या आहेत.