ऑनलाईन टीम / पुणे :
ज्येष्ठ विधिज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. भास्करराव आव्हाड यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा ॲड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी व बंधू ॲड. सुधाकर आव्हाड आणि त्याची मुले असा परिवार आहे. आव्हाड यांच्या जाण्याने शहरातील अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आव्हाड हे केवळ वकीलच म्हणून नाही तर सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. लॉक डाऊन च्या काळात ही त्यांनी कायद्याचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. तसेच बदलते कायदे आणि न्यायालयीन व्यवस्थे बाबत त्यांनी राज्यभरात शंभरपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. विविध वृत्तपत्रे, मासिके, यामध्ये छापून आलेले आणि समाजात कायद्याविषयी जागृती आणणारे त्यांचे लेख वाचनीय आहेत.
तसेच त्यांच्या या बहुमूल्य कामगिरी बद्दल त्यांना अनेक सामाजिक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या जाण्याने वकिली क्षेत्रातील चांगले मार्गदर्शक हरपल्याची भावना अनेक वकील, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.