प्रतिनिधी/ पणजी
देशात कोरोनाच्या महासंकट काळात गरजू गरजवंतांना मदत करणाऱया खास करून सिनेजगताशी संबंधित कोविड हिरोंच्या गौरवाप्रित्यर्थ आयोजित ’ज्वेल ऑफ इंडिया-सीजन 2’ हा कार्यक्रम आज दि. 13 रोजी उत्तर गोव्यातील प्लेनेट बीच रिसोर्टमध्ये होणार आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ’अव्युक्ता मीडिया’च्या डॉ. राधिका वाघ यांनी ही माहिती दिली. त्यावेळी अभिनेता इजाज खान, संतोष शुक्ला, मोहमद सलमान कुरेशी, ललित शेठी, प्रशांत सोलापूरकर, नीरज भटनागर, शम्पा मोन्डल, अभिषेक चौहान यांची उपस्थिती होती.
ज्वेल ऑफ इंडिया हा संकल्पना आधारित रॅम्प शो असून त्याचाच भाग म्हणून या कोविड हिरोना गौरविण्यात येणार आहे. यापूर्वीच्या सीजन 1 मध्ये अत्यंत संघर्षमय जीवनातून वर येत यशस्वीतेकडे पोहोचलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला होता. आता सीजन 2 मध्ये कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचविण्यासाठी झटलेल्या कोविड हिरोंचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती वाघ यांनी दिली.
या संकटकाळात केवळ डॉक्टर्स, पोलीस, यांनीच काम केलेले नाही तर समाजातील अन्य कित्येक घटकांनीही फार मोठे योगदान दिलेले आहे. अशा ज्ञात अज्ञात कोविड वॉरिर्यसच्या बद्दलही यावेळी आदरभाव व्यक्त करण्यात येणार आहे. या गौरवमूर्तीमध्ये गोव्यातीलही काही महनीय व्यक्तींचा समावेश असेल, असेही वाघ यांनी सांगितले.