सलग तीन पराभवानंतर मागील लढतीत विजय मिळवल्याने पंजाबच्या आशाअपेक्षा पल्लवित
अहमदाबाद / वृत्तसंस्था
मागील सामन्यात सलग 3 पराभवांची शृंखला खंडित करत मुंबई इंडियन्सला नमवणाऱया पंजाब किंग्स संघाची आज झगडणाऱया केकेआरविरुद्ध आयपीएल साखळी लढत होत आहे. केकेआर संघ सलग 4 पराभव पत्करावे लागले असल्याने दडपणाखाली असून त्याचा लाभ पंजाब घेणार का, हे आज स्पष्ट होईल. सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
कर्णधार केएल राहुलने या हंगामात सातत्य राखले असून मुंबई इंडियन्सविरुद्ध नाबाद 60 धावांची त्याची खेळी आदर्शवत ठरली. आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात हे त्याचे तिसरे अर्धशतक ठरले. मयांक अगरवाल देखील समयोचित योगदान देत आला असून युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने मुंबईविरुद्ध नाबाद 43 धावा फटकावत आपला फॉर्म दाखवून दिला, ही देखील पंजाबची आणखी एक जमेची बाजू आहे.
दीपक हुडा मात्र एका लक्षवेधी योगदानानंतर त्याची पुनरावृत्ती करु शकलेला नाही. पंजाबला कामगिरीत सातत्य राखायचे असेल तर हुडाचे योगदान त्यांच्यासाठी अर्थातच महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी 4 सामन्यात 3 वेळा शून्यावर बाद झालेल्या आणि एका डावात 9 धावा जमवू शकलेल्या निकोलस पूरनच्या संघातील जागेवर टांगती तलवार असणे साहजिक आहे. रवी बिश्नोई (2-21) व मोहम्मद शमी (2-21) यांनी मागील सामन्यात उत्तम मारा केला होता. अगदी युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने देखील सातत्यपूर्ण गोलंदाजी केली असून 5 सामन्यात 6 बळी घेतले आहेत.
दुसरीकडे, केकेआरचा संघ अद्याप तळाच्या स्थानी घसरतच चालला आहे. इंग्लंडचा विश्वचषक जेता कर्णधार इयॉन मॉर्गन येथे अद्याप सहकाऱयांकडून अपेक्षित कामगिरी करवून घेऊ शकलेला नाही, हे स्पष्ट आहे. मागील लढतीत केकेआरला राजस्थान रॉयल्सविरुद्ध 6 गडय़ांनी पराभव पत्करावा लागला होता. ही अपयशी मालिका खंडित करायची असेल तर केकेआरला सर्वप्रथम फलंदाजीत आमुलाग्र सुधारणा करावी लागेल.
केकेआरच्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये केवळ नितीश राणाच दोन अर्धशतकांसह चमक दाखवू शकला असून अन्य फलंदाजांनी निराशाच केली आहे. जलद गोलंदाज पॅट कमिन्सने मात्र चेन्नईविरुद्ध सामना गमवावा लागला असला तरी त्यात 66 धावांची धुवांधार फलंदाजी साकारली होती. शुभमन गिल व मॉर्गन अतिशय खराब फॉर्ममध्ये असून ही या संघाची खरी चिंता आहे.
गिलला 5 डावात केवळ 80 धावा जमवता आल्या आहेत तर मॉर्गनची स्थिती त्यापेक्षा खराब असून त्याला 5 डावात केवळ 45 धावांवर समाधान मानावे लागले आहे. सुनील नरेन उत्तम फलंदाजी करु शकतो. पण, मागील 2 डावात तो ही अनुक्रमे 4 व 6 धावांवर बाद झाला आहे. गोलंदाजीच्या आघाडीवर रसेल, वरुण चक्रवर्ती व प्रसिद्ध कृष्णा काही अंशी यशस्वी ठरत आले आहेत. रसेलने 7, चक्रवर्तीने 6 तर प्रसिद्ध कृष्णाने आतापर्यंत 5 बळी घेतले आहेत. कमिन्स मात्र अपेक्षा पूर्ण करु शकलेला नसून त्याला 5 सामन्यात 4 बळी घेता आले आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
पंजाब किंग्स ः केएल राहुल (कर्णधार व यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोईसेस हेन्रिक्यूज, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलन, सौरभ कुमार.
केकेआर ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शकीब अल हसन, शेल्डॉन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.