पाच लाखाहून अधिक नुकसान
प्रतिनिधी /वास्को
सांकवाळ पंचायतीच्या झुआरीनगरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकल्पातील बेलिंग मशिन व शेड जळाल्याने पाच लाखाहून अधिक रूपयांची नुकसानी झाली आहे. चिखलीचे उपसरपंच गिरीष पिल्ले यांनी हा प्रकार कुणी तरी मुद्दामहून केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
झुआरीनगरातील झुआरी इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेडच्या केंद्रासमोरील महामार्गाच्या बाजुलाच हा कचरा प्रक्रिया प्रकल्प साधारण दीड वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. सोमवारी मध्यरात्री या प्रकल्पाला आग लागली. यात संपूर्ण शेडमध्ये आग धुमसल्याने शेडची पूर्ण वाताहात झाली. यात बेलिंग मशिनही जळाले. या घटनेत पाच लाखाहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. वेर्णा व वास्कोतील शासकीय अग्नीशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी सकाळपर्यंत कष्ट घेतले. त्यामुळे पंधरा लाखाहून अधिक किमतीची मालमत्ता वाचली. या घटनेप्रकरणी सांकवाळचे उपसरपंच गिरीष पिल्ले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही विघ्नसंतोषी व्यक्तीनी ही आग लावल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलीस तक्रार केलेली असून चौकशी मागणी केली आहे.