मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिलेली माहिती, नव्याने निविदा काढण्यात अपयश
प्रतिनिधी /मडगाव
घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेली तीन महिन्यांची मुदतवाढ 31 ऑक्टोबर रोजी संपली असून मडगाव पालिकेला नवीन निविदा काढण्यात अपयश आल्याने आता कचरा गोळा करण्यात गुंतलेल्या दोन्ही एजन्सीना आणखी तीन महिन्यांची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली आहे.
मुदत संपल्याने 1 नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे काम थांबायचे होते, परंतु दोन्ही कंत्राटदारांनी हे काम सुरू ठेवले होते. कारण त्यांना मुदतवाढ मिळेल याची खात्री होती असे दिसून येते. निविदा काढण्यास का विलंब होतो अशी विचारणा नगराध्यक्ष शिरोडकर यांच्याशी केली असता आपण अलीकडेच नगराध्यक्ष म्हणून ताबा घेतला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मध्यंतरी नगराध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे विलंब होऊन निविदा तयार नसल्याने आणि कचरा उचल हे आणीबाणी स्वरूपाचे काम असल्याने ही मुदतवाढ देणे भाग पडल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले.
जरी नगराध्यक्षपद रिक्त होते, तरी उपनगराध्यक्ष हे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहत होते व निविदा प्रक्रिया तयार करण्याचे काम पालिका प्रशासनाचे असते. त्यासाठी मुख्याधिकारी व तांत्रिक विभागाचे अन्य अधिकारी असताना कोटय़वधी रुपयांच्या निविदा काढण्यास का चालढकल होत आहे असा प्रश्न उपस्थित होत असून पालिका प्रशासन यामुळे उघडे पडल्याचे दिसून येते. औपचारिकतेचे पालन केल्याशिवाय कराराची ही मुदतवाढ नियमास धरून नसल्याचे स्पष्ट होत आहे.
करार वाढविण्याची ही पालिकेची पहिलीच वेळ नाही. कोविडच्या नावाखाली मुदतवाढ दिल्यानंतर गेल्या वेळी पालिकेने 5 कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढली होती. परंतु पालिका संचालकांनी त्यातील विसंगती दर्शवून निविदा परत पाठविली होती. 22 जुलै रोजी पालिका मंडळाच्या बैठकीसमोर हे निरीक्षण मांडण्यात आले असता नगरसेवकांनी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी आणखी एक निविदा काढण्याचा आणि त्या कालावधीत औपचारिकतेचे पालन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याने आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
कचरा संकलन प्रणालीत आहे खूप ‘मध’ : कुतिन्हो
कचरा संकलन कंत्राटदारांच्या बंधनातून पालिका मंडळ किंवा लोकप्रतिनिधी बाहेर जाऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कारण या कचरा संकलन प्रणालीत खरोखरच खूप मध जोडलेले आहे, अशी टीका शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी पालिकेने कचरा उचल एजन्सींना मुदतवाढ देण्याच्या घेतलेल्या निर्णयावर केली आहे. कचरा संकलन ही अत्यावश्यक सेवा असल्याने ही फसवणूक थांबवता येणार नाही अशी खोटी सबब पालिका संचालकांसह कोणतेही प्राधिकरण कसे देऊ शकते, असा सवाल त्यांनी केला. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही सातत्याने हा मुद्दा मांडत आलो आहोत. आम्हाला करदात्यांची आणि विशेषतः मडगावकरांची मनापासून दया येते, असे कुतिन्हो यांनी पुढे म्हटले आहे.