प्रतिनिधी/ बेळगाव
नेहरु रोड, टिळकवाडी येथे सुमारे 8 लाखाची बेकायदा दारू जप्त करण्यात आली. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी विभागाने ही कारवाई केली असून जप्त दारूसाठा लष्करासाठीचा असल्याचे अबकारी विभागाने सांगितले.
शाम रंगण्णा रेड्डी (वय 52, रा. द्वारकानगर, चौगुलेवाडी, टिळकवाडी) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त जैरामेगौडा एम. डी., उपअधीक्षक सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुनाथ मेळ्ळीगेरी, आर. एम. नदाफ, संतोष दोडमनी, आर. तिगडी, आनंद पाटील, विनायक बोरणण्णावर आदींनी ही कारवाई केली आहे.
शुक्रवारी टिळकवाडी येथील श्रीनिवास अपार्टमेंटच्या तळमजल्यातील बेकायदा दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली केए 22 एचएच 5962 क्रमांकाची सुझुकी एक्सेस दुचाकी, लष्करासाठी पुरविण्यात आलेला 232 लिटर दारूसाठय़ासह एकूण 8 लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अबकारी अधिकाऱयांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.