वृत्तसंस्था/ दुबई
भारताच्या मध्यफळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव व वेंकटेश अय्यर यांनी आयसीसी टी-20 मानांकनात अनुक्रमे 21 व 115 व्या स्थानावर झेप घेतली आहे. विंडीजविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतील शानदार कामगिरीचा त्यांना मानांकनात बढती मिळण्यासाठी लाभ झाला.
दोघांनीही विंडीजविरुद्ध चकदार प्रदर्शन केले. सुर्यकुमारने भारतातर्फे सर्वाधिक धावा जमविल्या तर वेंकटेश दुसऱया स्थानावर राहिला. या कामगिरीमुळे यादवने 35 स्थानांची झेप घेत 21 व्या स्थानावर मजल मारली तर अय्यरने तब्बल 203 स्थानांची प्रगती करीत 115 व्या स्थानावर मजल मारली आहे. केएल राहुलची दोन स्थानांनी घसरण झाली असून तो सहाव्या स्थानावर आहे तर कोहली 10 व्या स्थानावर स्थिर आहे. गोलंदाजी व अष्टपैलूंच्या यादीत भारताच्या एकाही खेळाडूला टॉप टेनमध्ये स्थान मिळालेले नाही. मालिकेत एकाकी लढत दिलेल्या विंडीजच्या निकोलस पूरनने पाच स्थानांची प्रगती करीत 13 वे स्थान मिळविले आहे.
ऑस्ट्रेलिया-लंका टी-20 मालिकेमुळेही क्रमवारीत थोडा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऍश्टन ऍगरने गोलंदाजांच्या यादीत टॉप टेनमध्ये स्थान मिळविले असून तो आता नवव्या स्थानावर आहे. लंकेच्या महीश तीक्षणाने 12 स्थानांची झेप घेत 17 वे स्थान घेतले आहे.
कसोटी मानांकनात नवा कर्णधार रोहित शर्माने सहावे स्थान कायम राखले आहे तर कोहलीने एका स्थानाची बढती मिळवित सातवे स्थान घेतले आहे. स्पिनर आर. अश्विन व जलद गोलंदाज जसप्रित बुमराह या दोनच भारतीय गोलंदाजांना टॉप टेनमध्ये स्थान मिळाले आहे. ते अनुक्रमे दुसऱया व दहाव्या स्थानावर आहेत. अश्विनने अष्टपैलूंमध्येही दुसरे स्थान कायम ठेवले आहे तर रविंद्र जडेजा तिसऱया स्थानी आहे. न्यूझीलंड-द.आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीनंतर काईल जेमीसन (825 रेटिंग गुण) व टिम साऊदी यांनी एकेक क्रमांकाची बढत मिळवित तिसरे व पाचवे स्थान मिळविले तर अष्टपैलूंमध्ये नील वॅग्नरने चार स्थानांची बढती मिळवित 13 वे स्थान घेतले आहे.