वृत्तसंस्था/ अकापुल्को, मेक्सिको
ऑस्ट्रेलियात 21 वे विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविल्यानंतर प्रथमच खेळणाऱया स्पेनच्या राफेल नदालने मेक्सिकन ओपन स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात डेनिस कुडलाचा पराभव केला.
नदालने हा सामना 6-3, 6-2 असा जिंकला. तीन आठवडय़ांच्या विश्रांतीनंतर खेळत असला तरी त्याच्या खेळात अजिबात ढिलाई दिसून आली नाही. या मोसमात त्याने आता सलग 11 सामने जिंकले आहेत. अन्य सामन्यात डॅनील मेदवेदेव्हने अग्रस्थान पटकावण्याच्या दिशेने आगेकूच करताना फ्रान्सच्या बेनोई पेअरचा 6-3, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. ही स्पर्धा त्याने जिंकली तर जोकोविचला मागे टाकत तो अग्रस्थानावर पोहोचणार आहे. जोकोविचने दुबईतील स्पर्धा जिंकली तरी त्याचा मेदवेदेव्हच्या क्रमांकावर परिणाम होणार नाही. ग्रीकच्या सित्सिपसने दुसरी फेरी गाठताना सर्बियाच्या लॅस्लो डेअरचा 7-6 (9-7), 7-6 (7-4) असा पराभव केला. त्याचा हा टूरवरील 200 वा विजय आहे.