वृत्त संस्था/ दुबई
आयसीसी टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा सलामीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के.एल.राहुलने पाचवे स्थान मिळविले. या मानांकन यादीत कोहलीच्या स्थानात घसरण झाली असून तो आता आठव्या स्थानावर आहे.
सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या मार्करमची कामगिरी दर्जेदार झाल्याने त्याने फलंदाजांच्या यादीत तिसऱया स्थानावर झेप घेतली. इंग्लंडविरुद्ध सामन्यात मार्करमने 25 चेंडूत नाबाद 52 धावा झोडपल्या होत्या. त्याचप्रमाणे टी-20 अष्टपैलूंच्या मानांकन यादीत मार्करेमने सातवे स्थान मिळविले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या व्हॅन डेर डय़ुसेनने फलंदाजांच्या मानांकन यादीत दहावे स्थान पटकाविले. इंग्लंडविरूद्ध डय़ुसेनने नाबाद 94 धावांची खेळी केली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत केले. पण, त्यांना या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली नाही.
आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या झाम्पा आणि हॅजलवूड यांनी अनुक्रमे पाचवे आणि आठवे स्थान मिळविले. न्यूझीलंडचा टीम साऊदी नवव्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलने चौथे तर मार्शने नववे स्थान मिळविले आहे. लंकेच्या हसरंगाने तिसरे स्थान पटकाविले.