वृत्तसंस्था/ डब्लिन
फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सलामी देताना पहिल्या सामन्यात यजमान आयर्लंडचा 33 धावांनी पराभव केला. ‘सामनावीर शम्सीने 27 धावांत 4 गडी बाद केले.
आयर्लंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 बाद 165 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या सात फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. मार्करमने 30 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 39, मिलरने 21 चेंडूत 3 चौकारांसह 28, व्हान डर डय़ुसेनने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25, डि कॉकने 9 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 20, रबाडाने 9 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 19, बेवुमाने 13 चेंडूत 2 चौकारांसह 13 लिन्डेने 13 चेंडूत 1 चौकारांसह 10 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 4 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे ऍडेरने 39 धावांत 3, सिमी सिंगने 19 धावांत 2 तसेच लिटलने 27 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडने 20 षटकांत 9 बाद 132 धावा जमविल्या. टेक्टरने 34 चेंडूत 3 चौकारांसह 36 मॅपेथीने 25 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 30, लिटलने 18 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 15, कर्णधार बलबर्नीने 16 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या. मॅपेथी आणि लिटल यांनी शेवटच्या गडय़ासाठी अभेद्य 44 धावांची भागिदारी केली. आयर्लंडच्या डावात 2 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे शम्सीने 4, एन्गिडीने 18 धावांत 2 तसेच लिन्डेने 26 धावांत 2 व रबाडाने 28 धावांत 1 गडी बाद केला. आता या मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी बेलफास्ट येथे खेळविला जाईल. यापूर्वी उभय संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 7 बाद 165 (मार्करम 39, मिलर 28, व्हान डर डय़ुसेन 25, डि कॉक 20, रबाडा नाबाद 19, बेवुमा 13, लिन्डे 10, ऍडेर 3-39, सिमी सिंग 2-19, लिटल 2-27), आयर्लंड 20 षटकांत 9 बाद 132 (टेक्टर 36, मॅपेथी नाबाद 30, लिटल नाबाद 15, बलबर्नी 22, शम्सी 4-27, लिन्डे 2-26, एन्गिडी 2-18, रबाडा 1-28).