मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका ः उभय संघात 3 टी-20, 3 वनडे लढती
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
यंदा ऑक्टोबरमध्ये आयोजित टी-20 वर्ल्डकपनंतर भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱयावर रवाना होणार असून उभय संघात 3 टी-20 व 3 वनडे खेळवले जातील, अशी घोषणा न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने मंगळवारी केली. उभय संघातील ही मालिका दि. 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होईल आणि त्यानंतर न्यूझीलंडचा संघ पुढील वर्षी जानेवारीत भारतात मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळेल, असे यावेळी जाहीर केले गेले.
‘भारतीय संघ टी-20 वर्ल्डकप संपन्न झाल्यानंतर न्यूझीलंड भूमीत दाखल होईल. वेलिंग्टन, टॉरंगा व नेपियर येथे 3 टी-20 व ऑकलंड, हॅमिल्टन व ख्राईस्टचर्च येथे 3 वनडे खेळेल. त्यानंतर किवीज संघ पाकिस्तान दौऱयावर जाईल आणि त्यानंतर भारतातील मालिका खेळल्यानंतर फेब्रुवारीमध्ये मायभूमीत इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरेल’, याचा न्यूझीलंड मंडळाने येथे उल्लेख केला.
तत्पूर्वी, यंदा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी भारतीय संघ जुलै-ऑगस्टमध्ये विंडीज दौऱयावर जाणार आहे. त्या दौऱयात उभय संघात 3 वनडे व 5 टी-20 सामने होणार आहेत. यंदा जॅम-पॅक आंतरराष्ट्रीय रुपरेषेनुसार, न्यूझीलंडचा संघही इंग्लंडविरुद्ध दिवस-रात्र कसोटी खेळणार आहे. याशिवाय, 2022-23 हंगामात एकूण 6 संघ दौऱयावर येतील. भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, श्रीलंकेचे पुरुष संघ व बांगलादेश महिला संघ न्यूझीलंड दौऱयावर येणार आहेत.
भारताच्या न्यूझीलंड दौऱयाची रुपरेषा
तारीख / सामना / ठिकाण
18 नोव्हेंबर / पहिली टी-20 / स्काय स्टेडियम, वेलिंग्टन
20 नोव्हेंबर / दुसरी टी-20 / बे ओव्हल, माऊंट माऊंगनुई
22 नोव्हेंबर / तिसरी टी-20 / मॅकलिन पार्क, नेपियर
25 नोव्हेंबर / पहिली वनडे / ईडन पार्क, ऑकलंड
27 नोव्हेंबर / दुसरी वनडे / सेडॉन पार्क, हॅमिल्टन 30 नोव्हेंबर / तिसरी वनडे / हॅग्ले ओव्हल, ख्राईस्टचर्च