नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
टुलकिट प्रकरणावरून मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. याप्रकरणी ट्विटरने भाजपचे नेते, प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने संबित पात्रा यांच्या या ट्विटला ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ म्हटलं आहे. म्हणजे संबित पात्रा यांनी केलेलं ट्विट हे तथ्यात्मकदृष्ट्या योग्य नसल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.
संबित पात्रा यांनी १८ मे रोजी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी काँग्रेस पक्ष एका टूलकिटद्वारे कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. संबित पात्रा यांनी दावा केला होता काँग्रेस टुलकिटच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहे. या ट्विटमध्ये एक पत्रक देखील देण्यात आलं होतं. ज्यावर काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर सोशल मीडियावर कशा प्रकारचे ट्विट करायचे आहेत आणि कोणती माहिती वापरायची याबद्दल माहिती होती.
ट्विटरने या ट्विटवर कारवाई करत यामध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे आणि त्याला ‘मॅनिपुलेटेड मीडिया’ म्हटले आहे. ट्विटरच्या धोरणानुसार, ट्विट करत असलेली कोणतीही माहिती जर तिचा स्रोत अचूक नसेल आणि माहिती देखील चुकीची असेल तर त्याला ‘मॅनिपुलेटेड मीडिया’चा टॅग लावला जातो. हा टॅग व्हिडिओ,फोटो किंवा अन्य माहितीवरसुद्धा लावला जाऊ शकतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीच्या दरम्यान ट्रम्प यांच्या अनेक ट्विटवर हा टॅग लावण्यात आला होता. त्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं होतं.
दरम्यान, टुलकिटप्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरूच आहेत. भाजपचे सर्व आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही भाजपवर जोरदार टीका केली होती.