वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सप्टेंबर महिन्यात विविध वाहन कंपन्यांनी प्राप्त केलेल्या विक्रीचे आकडे नुकतेच कंपन्यांनी सादर केले आहेत. यामध्ये काही कंपन्या तेजीत तर काही नुकसानीत राहिल्याचे चित्र होते. प्रमुख कंपन्यांची आकडेवारी पुढील प्रमाणे
बजाज ऑटो ः यामध्ये बजाज ऑटो कंपनीची देशातील विक्री चालू सप्टेंबर महिन्यात 16 टक्क्यांनी घसरुन 1,92,348 अंकांवर राहिली आहे.
टोयोटा ः दुसरीकडे टोयोटा किर्लोस्करची देशातील विक्री 14 टक्क्यांनी वधारुन 9,248 वर राहिली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये 8,116 वाहने कंपनीने विकल्याची नोंद आहे. आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये विक्रीत तेजी निर्माण होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
निस्सान ः निस्सान इंडियाची सप्टेंबर महिन्यातील देशातील किरकोळ वाहन विक्री ही तीन पटीने वधारुन 2,816 अंकांवर राहिली आहे. जी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 780 वर राहिली होती. तसेच 5,900 वाहनांची निर्यात करण्यात आली आहे.
एस्कॉर्ट्सची ट्रक्टर विक्री घटली ः सप्टेंबरमध्ये एकूण टॅक्टर विक्री ही 25.6 टक्क्यांनी घटून 8,816 वर राहिली आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये जवळपास 11,851 इतक्या ट्रक्टर्सची विक्री करण्यात आली होती. देशातील बाजारात मागच्या महिन्यात कंपनीने 7,975 ट्रक्टर्सची विक्री केली आहे.
एमजी मोटार ः एमजी मोटार इंडियाच्या माहितीनुसार सप्टेंबर 2021 मध्ये किरकोळ वाहन विक्री ही 28 टक्क्यांनी सुधारली आहे. कंपनीने 3 ,241 वाहनांची विक्री केली आहे.
चिप कमतरतेचा प्रभाव कायम
जगभरातील विविध कार कंपन्यांसोबत देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी मारूती सुझुकीने सेमिकंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात मारुती सुझुकी कंपनी 40 टक्के उत्पादनात कपात करणार आहे. म्हणजे महिन्याला कंपनी एकूण 60 टक्के उत्पादन घेणार आहे. ऑगस्टमध्येही तीन शनिवारी कंपनीचा प्लांट बंद राहिला होता.
इलेक्ट्रॉनिक उत्पादनेही प्रभावीत
सेमिकंडक्टर सिलिकॉन चिपाचा वापर हा प्रामुख्याने गाडी, संगणक आणि सेलफोनसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये होतो. काही महिन्यांपासून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये चिपचा वापर संपूर्ण जगभरात करण्यात येत आहे. यामध्ये सध्या अधिक प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांसह अन्य वाहन उत्पादनांच्या उत्पादनावर चिपच्या कमतरतेमुळे कपात होण्याचे संकेत अभ्यासकांनी वर्तवले आहेत.