अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक अंतिम टप्प्यात : 90 मिनिटांच्या चर्चेत 6 मुद्दे सामील : यंदा डिबेटचे स्वरुप बदललेले दिसून येणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षीय पदाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचू लागली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रेट उमेदवार ज्यो बिडेन मंगळवारी रात्री 9 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी 6.30 वाजता) पहिल्या अध्यक्षीय वादविवाद कार्यक्रमात भाग घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांदरम्यान एकूण 3 वादविवाद कार्यक्रम होणार आहेत. यातील दुसरा 15 तर तिसरा 22 ऑक्टोबर रोजी पार पडणार
आहे.
कोरोना संकटामुळे यंदाचे प्रचाराचे स्वरुपच बदलले आहे. वादविवाद कार्यक्रमाचा सूत्रधार एकच असणार असून पॅनालिट्स नसतील. प्रेक्षक असतील की नाही याबद्दल डिबेट कमिशनने अद्याप माहिती दिलेली नाही. तसेच हस्तांदोलनाची ऐतिहासिक परंपराही यंदा पाळली जाणार नाही. मॉडरेटर आणि उमेदवार मास्क परिधान करणार नसल्याचे समजते. तर ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया आणि कन्या इवांका प्रेक्षकांच्या जागेत उपस्थित असतील.
पहिली डिबेट : 29 सप्टेंबर 2020
वेळ : रात्री 9 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे 6.30 वाजता)
स्थळ : केस वेस्टर्न रिजर्व युनिव्हर्सिटी, क्लीवलँड (ओहायो)
किती वेळ चालणार : 90 मिनिटे (कुठलाच बेक नसणार)
मॉडरेटर : फॉक्स न्यूजचे सूत्रसंचालक ख्रिस वॉलेस असतील. 2016 मध्ये ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातील पहिली डिबेट वॉलेस यांनीच घडवून आणली होती.
मुद्दे : दोन्ही उमेदवारांची कामगिरी, सर्वोच्च न्यायालय, कोरोना विषाणू, अर्थव्यवस्था, वंशभेद-हिंसाचार आणि निवडणुकीतील हस्तक्षेप.
दुसरी डिबेट : 15 ऑक्टोबर 2020
वेळ : अद्याप निर्धारित नाही
स्थळ : एड्रियन एर्स्ट सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, मायामी
किती वेळ चालणार : 90 मिनिटे
मॉडरेटर : सी-स्पॅनचे राजकीय संपादक स्टीव सुली असतील. टाउन हॉल प्रकारातील डिबेट होणार. प्रेक्षक सामील होणार असले तरीही संख्या निश्चित नाही.
मुद्दे : कमिशन ऑन प्रेसिडेन्शियल डिबेट (सीपीडी) निश्चित करणार. घोषणा एक आठवडय़ापूर्वी केली जाणार.
तिसरी डिबेट : 22 ऑक्टोबर 2020
वेळ : अद्याप निश्चित नाही
स्थळ : बलेमॉन्ट युनिव्हर्सिटी, नेश्विन
किती वेळ चालणार : 90 मिनिटे
मॉडरेटर : एनबीसीच्या व्हाइट हाउस प्रतिनिधी क्रिस्टिन वेकर असतील. प्रेसिडेन्शियल डिबेट मॉडरेट (एकटय़ाने) करणाऱया त्या दुसऱया बिगरश्वेतवर्णी महिला आहेत.
मुद्दे : 6 मुद्दे राहणार असून सीपीडीकडून ते निश्चित केले जातील. एक आठवडय़ापूर्वी त्यांची घोषणा होणार आहे.
अप्रूवल रेटिंग
निवडणुकीला आता केवळ 5 आठवडे शिल्लक आहेत. नॅशनल अप्रूवल रेटिंगमध्ये बिडेन हे अध्यक्ष ट्रम्प यांच्यापेक्षा 10 गुणांनी आघाडीवर आहेत. महामारी आणि आरोग्य सुविधा यासारख्या मुद्दय़ांवर बिडेन यांना अधिक पाठिंबा मिळत असल्याचे मानले जात आहे. एबीसी न्यूज आणि वॉशिंग्टन पोस्टच्या सर्वेक्षणानुसार बिडेन 54-44 ने पुढे आहेत. परंतु ट्रम्प लवकरच कोविड-19 वर नियंत्रण मिळवतील असे काही मतदारांचे मानणे आहे.
उपाध्यक्षीय डिबेट
केव्हा : 7 ऑक्टोबर 2020
स्थळ : सॉल्ट लेक सिटीतील उटाह युनिव्हर्सिटी (किंग्सवरे हॉल)
मॉडरेटर : सूसान पेज असतील. त्या युएसए टुडेच्या वॉशिंग्टन ब्युरो चीफ आहेत.
मुद्दे : एक आठवडय़ापूर्वी सीपीडी घोषणा करणार. 9 मुद्दय़ांचा असणार समावेश.