ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे व्हाईट हाऊसमध्ये ‘रिसिन’ नावाचे घातक विष असलेले पार्सल पाठवण्यात आले आहे. हे पार्सल ट्रम्प यांच्याकडे पोहचण्यापूर्वी व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी ते 2 वेळा तपासले. त्यामध्ये हे कारस्थान उघड झाले.
ट्रम्प यांना एका लिफाफ्यात हे ‘रिसिन’ विष पाठवण्यात आले होते. हे पार्सल कॅनडातून आले असावे, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि सिक्रेट सर्व्हिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रिसिन हा एक विषारी पदार्थ आहे, जो एरंडेलच्या बियांमधून निघतो. हे विष शरीरात गेले तर त्या व्यक्तीला उलट्या सुरु होतात आणि पोटात तसेच आतड्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव सुरु होतो. तसेच किडनी फेल होऊ शकते.