बुधवारपासून हैदराबाद, तिरुपती सेवा सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाववरून म्हैसूरला जाणाऱया विमानामध्ये सोमवारी रात्री अचानक बिघाड झाला होता. यामुळे हे विमान चेन्नईला इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यामुळे मंगळवारची ट्रू जेट कंपनीची सेवा ठप्प झाली होती. बुधवारपासून बेळगावमधून ट्रू जेटची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. हैदराबाद व तिरुपती या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास बेळगाववरून 52 प्रवासी व 5 विमान कर्मचाऱयांसह विमान म्हैसूरच्या दिशेने निघाले. म्हैसूरजवळ गेले असता विमानामध्ये बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर विमान थेट चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. अचानक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने हे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यामुळे काहीकाळ चेन्नई विमानतळावरील उड्डाणे थांबविण्यात आली होती.
एअर क्राफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे ट्रू जेट कंपनीने मंगळवारची सर्व उड्डाणे रद्द केली होती. बुधवारी हैदराबाद व तिरुपती या शहरांची सेवा पूर्ववत करण्यात आली. परंतु म्हैसूर व कडाप्पा या शहरांच्या विमानसेवा बुधवारी तरी बंद होत्या. यामध्ये प्रवासी सुखरुप असले तरी या पुढील काळात तरी कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.