ग्रामीण भाग-वयोवृद्ध नागरिकांसाठी सुविधा ठरणार लाभदायक
प्रतिनिधी / बेळगाव
पेन्शनधारकांना वर्षातून एकदा हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. दरवषी नोव्हेंबर महिन्यात हे हयात प्रमाणपत्र सादर केले जाते. बँक किंवा पोस्ट कार्यालयात हे हयात प्रमाणपत्र देण्यात येते. परंतु वयोवृद्ध पेन्शनधारकांना आता घरीच राहून हयात प्रमाणपत्र मिळणार आहे. पोस्ट विभागाच्यावतीने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट दिले जाणार असल्याची माहिती पोस्ट विभागाने दिली आहे.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून पोस्ट विभाग घरोघरी जाऊन आर्थिक व्यवहार करीत आहे. ग्रामीण भाग तसेच वयोवृद्धांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पोस्टमन तसेच ग्रामीण डाक सेवक पेन्शनधारकाच्या घरी जाऊन त्यांना सेवा देणार आहेत. यामुळे हयात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करण्याची गरज राहणार नाही.
बेळगाव विभागात शहरी तसेच ग्रामीण भागात ही सेवा दिली जाणार आहे. पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधून हयात प्रमाणपत्र मिळविता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक पेन्शनधारकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्ट विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.