शिक्षकांकडे पैशांची मागणी केल्याची तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षकांना सरकारकडून मिळणारे भत्ते तसेच रजा न घेता काम केल्यानंतर मिळणारी रक्कम घेण्यासाठी बेळगावच्या टेझरी कार्यालयात गेलेल्या शाळांच्या प्रतिनिधींकडे पैशांची मागणी करण्यात आली. यामुळे आक्रमक झालेल्या माध्यमिक शिक्षक संघाने टेझरी कार्यालयात जाऊन असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. टेझरी विभागाच्या अधिकाऱयांना निवेदन देऊन असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्याची मागणी केली.
2018 पासून मिळालेले भत्ते त्याचबरोबर वर्षातून मिळणाऱया रजा सोडून ज्या दहा रजा मिळतात त्या न घेतल्यास सरकारकडून रक्कम मिळते. यासाठी कागदपत्रांची पूर्तता करूनही काही कर्मचारी पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे माध्यमिक शिक्षक संघाच्या सदस्यांनी मंगळवारी टेझरी कार्यालय गाठून याबाबतची माहिती घेतली. त्यावेळी अशा प्रकारे कोणी तरी एजंट व्यक्तीने पैसे मागितले असल्याचे सांगण्यात आले. असे प्रकार यापुढे घडल्यास खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
टेझरी खात्याच्या संचालिका बिद्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव उमेश कुलकर्णी, शहर अध्यक्ष संजीव कोष्टी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.