सातारा पालिकेतील प्रकार, विरोधी नगरसेवकांकडून फाईलींचा शोध सुरु
प्रतिनिधी/ सातारा
नुकत्याच काही दिवसांपूर्वी सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. त्या सभेच्या अगोदर स्थायीची सभा झाली. या सभेत काही नगरसेवकांचे विषय घेतले नव्हते. त्यावरुन नगरसेवकांमध्ये रुसारुसी सुरु आहे. त्यातूनच एका नगरसेवकाने चक्क ठराव घेतल्याच्या फाईली घरी नेल्याची सातारा पालिकेत जोरदार चर्चा सुरु आहे. तर विरोधी नगरसेवकांकडून फाईल कुठे आहेत याचा शोध सुरु आहे. त्यामुळे पाठीमागे स्ट्रीट लाईटच्या प्रस्तावाची फाईलच गायब झाली होती. ते प्रकरण सभागृहात चांगलेच गाजले होते. आताही तसा काहीसा प्रकार होणार तर नाही अशीही चर्चा सुरु आहे.
सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. सत्तेमध्ये सातारा विकास आघाडी आहे. विरोधात नगरविकास आघाडी आहे. नगरविकास आघाडी आणि सातारा विकास आघाडी या दोन्ही आघाडीचे नेते एकाच पक्षात असले तरीही दोन्ही आघाडय़ांचे नगरसेवक एकमेकांना जिरवाजिरवी करत आलेले ओहत. आता तर पालिकेची निवडणूक जवळ येवून ठेपल्याने कोण कोणाची किती जिरवतो आणि कोण कोणाची किती मिरवतो हेच सुरु आहे. त्यातूनच काही दिवसांपूर्वी स्थायी आणि सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये काही नगरसेवकांचे विषय डावल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली गेली. तर काही नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. काही नगरसेवकांनी थेट वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या. त्यानंतर ऑनलाईन सभेत नेमके कोणते मुद्दे घेतले अन् कोणते मुद्दे प्रोसिडिंगवर नेमके काय मुद्दे आलेले आहेत. याचीच एका बाजूला चर्चा सुरु असतानाच चक्क एका नगरसेवकाने एका नगरसेवकाच्या विषयाची फाईलच घरी नेल्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे. तर ज्यांच्या विषयाची फाईल नेली आहे त्या नगरसेवकाकडून फाईलची शोधाशोध सुरु आहे. त्यामुळे फालिकेत पुन्हा एकदा फाईलीला पाय फुटले असून पालिकेतून फाईल बाहेर जातात कशी अशी चर्चा सुरु आहे.