टुगेदर फॉर डिचोलीचे सर्व 12 अर्ज सादर. चार भाजपच्या उमेदवारांचे अर्ज. एकूण अर्जांची संख्या 55. उर्वरित सर्व उमेदवारी अर्ज आज सादर होणार
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली नगरपालिका निवडणुकीसाठी काल बुध. दि. 3 मार्च रोजी एकूण 31 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या आता 55 इतकी झाली आहे. माजी आमदार नरेश सावळ यांच्या टुगेदर फॉर डिचोली या गटातील सर्व 12 अधिकृत उमेदवारांनी अर्ज सादर केले. भाजप समर्थक 4 उमेदवारांनी अर्ज सादर केले. तसेच डिचोली तालुका विकास परिषदेच्या 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. काही अपक्षपणे रिंगणात उतरणाऱया उमेदवरांनीही आपले उमेदवारी अर्ज सादर केले. आज गुरू. दि. 4 मार्च हा अर्ज सादर करण्याच अखेरचा दिवस असल्याने उर्वरित सर्व उमेदवारांचे अर्ज आज सादर होणार आहेत.
टुगेदर फॉर डिचोली पेनलचे सर्व 12 उमेदवारी अर्ज दाखल
माजी आमदार नरेश सावळ यांच्या टुगेदर फॉर डिचोली या पेनलतर्फे निवडणूक रिंगणात उतरणाऱया 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत नरेश सावळ, सुदिन नायक, भालचंद्र नार्वेकर, एग. वल्लभ फळारी, भगवान हरमलकर, वीणा नाईक, कमलाकर तेली व इतरांच उपस्थिती होती.
या पेनलतर्फे प्रभाग क्र. 1 मध्ये रोहिदास गाड, प्रभाग 2 मध्ये माजी नगरसेविका अनिता हरमलकर, प्रभाग 3 मध्ये माजी नगरसेविका सुखदा तेली, प्रभाग 4 मध्ये माजी नगरसेविका सुखदा तेली, प्रभाग 6 मध्ये एड. रंजना समीर वायंगणकर, प्रभाग 7 मध्ये जितेंद्र (बंडय़ा) गावठणकर, प्रभाग 8 मध्ये एड. अपर्णा चंदन फोगेरी, प्रभाग 10 मध्ये सुशांत रावळ, प्रभाग 11 मध्ये विश्वनाथ मांदेकर, प्रभाग 12 मध्ये रमेश गावकर, प्रभाग 13 मध्ये प्रदोष आमोणकर, प्रभाग 14 मध्ये किरण गोवेकर या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दिपक वायंगणकर व उपनिवडणूक अधिकारी प्रवीणजय पंडित यांच्याकडे सादर केले.
भ्रष्टाचार विरहित आणि डिचोलीच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी कटिबद्ध – नरेश सावळ.
डिचोलीतील लोकांना विश्वासात घेऊन टुगेदर फॉर डिचोली या पेनलमर्फत उमेदवार रिंगणात उतरविण्यात आलेले आहेत. स्वच्छ आणि सुंदर डिचोली बरोबरच डिचोली नगरपालिका भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या बाबतीतही स्वच्छ करण्यासाठी हे पेनल कटिबद्ध असणार. डिचोलीवासीयांना हवा असलेल्या विकासाला प्राधान्य देऊन शाश्वतपणे विकास साधण्यासाठी समस्त डिचोलीवासीय आमच्या सोबत राहणार, असा विश्वास माजी आमदार नरेश सावळ यांनी व्यक्त केला.
भाजप समर्थकांतर्फे तर्फे 4 उमेदवारी अर्ज दाखल
या पालिका निवडणुकीत भाजप समर्थक चार उमेदवारांनी काल बुधवारी उमेदवारी अर्ज सादर केले. प्रभाग 1 मधून माजी नगरसेवक विजयकुमार नाटेकर, प्रभाग 3 मधून अर्चना गायकवाड, प्रभाग 7 मधून अनिकेत चणेकर, प्रभाग 8 मधून माजी नगरसेवक अजित बीर्जे यांची पत्नी सोनाली बीर्जे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. सर्वांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
डिचोली तालुका विकास परिषदतर्फे 3 उमेदवार
डिचोली तालुका विकास परिषदतर्फे यापूर्वी प्रभाग 6 मधून शुभलता कळंगुटकर यांनी अर्ज सादर केला होता. तर काल बुध. दि. 3 रोजी प्रभाग 2 मधून पौर्णिमा भोलानाथ गाड, प्रभाग 3 मध्ये नितीन मळगावकर, प्रभाग 4 मध्ये मेधा नितीन मळगावकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत या पेनलचे 4 उमेदवारी अर्ज सादर झालेले आहेत.
अनेक अपक्षांचेही अर्ज सादर
प्रभाग 1 मध्ये ऋतुराज खोत, प्रभाग 4 मध्ये गायत्री गोकुळदास हरमलकर, प्रभाग 5 मध्ये निलेश टोपले व यश पणजीकर, प्रभाग 8 मध्ये सुरत सावळाराम च्यारी, प्रभाग 9 मध्ये माजी नगरसेवक निसार शेख, नझीर बेग, शैख फैयाझ मामलेकर व अमानउल्ला खान पठाण, प्रभाग 12 मध्ये रघुवीर परब प्रभाग 13 मध्ये समरेश काणेकर, अपर्णा आमोणकर यांनी अपक्षपणे तर काहींनी आपल्या उमेदवारांचे डमी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आज गुरू. दि. 4 रोजी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिवस असल्याने उर्वरित सर्व उमेदवरांचे अर्ज आज दाखल होणार आहेत. भाजपसह काँग्रेस आणि व्हिजन डिचोली या गटातर्फेही काही उमेदवारांचे अर्ज अजूनही सादर झालेले नाहीत. ते आजच्या अखेरच्या दिवशी येणार आहेत.