नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) सोबत डिसेंबर 2020 मध्ये जवळपास 12.54 लाख नवीन सदस्य जोडले गेले आहेत. डिसेंबर 2019 पेक्षा हे प्रमाण 24 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती आहे. या आकडेवारीमधून आता देशामध्ये पुन्हा एकदा वेगाने रोजगार प्राप्ती होत असल्याचे संकेत आहेत. या अगोदर नोव्हेंबर 2020 मध्ये हा आकडा 10.11 लाख इतका होता. 2020-21 मध्ये आतापर्यंत एकूण 57.83 लाख नवीन सदस्य ईपीएफओसोबत जोडले असल्याची नोंद करण्यात आली आहे. ईपीएफओनुसार ऑक्टोबरमध्ये 11.55 लाख आणि सप्टेंबरमध्ये 14.90 लाख नवीन सदस्य संघटनेशी जोडले होते. मार्च महिन्यातील नवीन नोंदणीत घट होत 5.72 लाखावर राहिली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये नवीन सदस्य 10.21 लाख ईपीएफओसोबत जोडले असल्याची माहिती आहे. कोरोना महामारीमुळे व लॉकडाऊनच्या प्रभावामुळे नवे सदस्य जोडण्यात अडचणी निर्माण झाल्याचे म्हटले गेले आहे.