काँग्रेसची मागणी, वाढ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी/ पणजी
गोवा दंत महाविद्यालयाचे (डेंटल कॉलेज) शुल्क वाढवून रू. 2 लाख केल्याने काँग्रेस पक्षाने सरकारचा निषेध केला आहे. येत्या 10 दिवसात ते शुल्क पुर्ववत न केल्यास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या निवासासमोर आंदोलन करण्याचा इशारा एनएसयुआय तसेच प्रोफेशनल काँग्रेस विभागाने दिला आहे.
पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रोफेशनल काँग्रेसचे निमंत्रक डॉ. आशिष कामत व एनएसयुआय गोवा प्रदेश अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी या प्रकरणी आवाज उठवला आणि हे सरकार आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्याचा आरोप केला. दंत महाविद्यालयात 50 जणांना शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. या आधी रू. 24 हजार असलेले शुल्क आता चक्क रू. 2 लाख एवढे करण्यात आले आहे. एका सेमिस्टरसाठी रू. 12 हजार म्हणजेच वर्षाला दोन सेमिस्टरसाठी रू. 24 हजार होतात. तेच प्रति सेमिस्टर शुल्क रू. 1 लाख करण्यात आल्याने वर्षाला रू. 2 लाख भरावे लागणार आहेत. ही शुल्क वाढ 833 टक्के एवढी असल्याचे डॉ. कामत व श्री. मुल्ला यांनी सांगितले. या शुल्क वाढीमुळे गोवा मेडिकल व इतर पॅरामेडिकल शुल्क वाढण्याचे संकेत मिळत असून कोरोना काळात शुल्क माफ करण्याचे सोडून शुल्क वाढविण्याचा निर्णय हा विद्यार्थी विरोधी असल्याची टीका त्यांनी केली. विद्यार्थी पालक यांच्याशी हे सरकार खेळत असून एवढी लाखो रूपयांची रक्कम गरीबांनी कोठून आणायची ? असा प्रश्न डॉ. कामत व श्री. मुल्ला यांनी विचारला आहे. खासगी कॉलेज मोठय़ा प्रमाणात शुल्क घेतात मग सरकारी कॉलेजने ती का घेऊ नये ? असे मंत्री राणे यांना वाटते. त्यांनी या प्रकरणी हरियाणा सरकारची नक्कल केली असून वाढवलेले शुल्क सामान्य विद्यार्थी, पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे शुल्क वाढ रद्द करावी अन्यथा 7 डिसेंबरनंतर मंत्री राणे यांच्या निवास स्थानासमोर शड्डू ठोकणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी सिमरण, मळकर्णेकर, नौशाद चौधरी उपस्थित होते.