जेसीबीचा डेनेज वाहिनीला धक्का लागल्याने समस्या
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे येथील शिवाजी उद्यानशेजारील रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर रस्ता ओल्ड पी. बी. रोडला मिळत असल्याने येथील संपूर्ण रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे काम करताना जेसीबीचा धक्का डेनेज वाहिनीला लागल्याने रस्त्यावर सांडपाणी साचलेले आहे. त्यामुळे येथून ये-जा करताना वाहनधारकांना समस्या निर्माण होत आहे.
आधीच पावसामुळे येथील रस्त्यावर चिखलाने दलदलीचे साम्राज्य निर्माण होते. मात्र, आता दोन दिवस पडलेल्या कडक उन्हाने सदर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या डोळय़ात धुळीचे कण जाऊन डोळय़ांचे आजार उद्भवत आहेत. मात्र, ओल्ड पी. बी. रोडनजीक डेनेज वाहिनी फुटल्याने सांडपाणी रस्त्यावर साचून तळी निर्माण झालेली दिसून येत आहेत.
येथून ये-जा करताना नागरिकांना सांडपाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे बाजूने एखादे वाहन गेल्यास रस्त्यावरील सांडपाणी अंगावर उडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे येथील डेनेजची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी होत आहे.