ब्लाग्ज बेळगाव शाखेसह आयएमएकडून जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल केल्याच्या मनस्तापातून राजस्थानच्या दौसा येथे अर्चना शर्मा या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. ही अत्यंत निषेधार्थ बाब असून डॉक्टरांना लक्ष्य करण्याचे प्रकार त्वरित थांबवावे, अशा आशयाचे निवेदन बेळगाव ऑबस्ट्रीक्स ऍण्ड गायनाकॉलॉजिस्ट सोसायटीच्या ब्लाग्ज बेळगाव शाखेने तसेच आयएमए बेळगावने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱयांतर्फे पाठविले आहे.
या निवेदनात डॉक्टरांनी नमूद केले आहे की, स्त्री रोग व प्रसूती तज्ञ डॉक्टरांच्या फेडरेशनमध्ये 38 हजारांहून अधिक डॉक्टर आहेत. अलीकडच्या काळात डॉक्टरांवर निष्कारण हल्ले होत आहेत. डॉ. अर्चना यांच्यावर नोंदविलेला गुन्हा योग्य नसून पूर्ण चौकशी करून गुन्हय़ाची नोंद होणे व कारवाई होणे आवश्यक होते.
प्रसूतीवेळी अनेक गुंतागुंती निर्माण होतात. कोणताही डॉक्टर रुग्ण वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो. परंतु गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून डॉ. अर्चना यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे हे अत्यंत चुकीचे आहे. फॉगसीने सुद्धा ही बाब गांभीर्याने घेतली असून असे प्रकार खपवून घेणार नाही. असे स्पष्ट केले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करून डॉक्टरांना कामाच्या जागी संरक्षण दिले पाहिजे. अर्चनाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर त्वरित कारवाई करावी व डॉ. अर्चना यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी डॉक्टरांनी यावेळी केली आहे.
ब्लाग्जचे अध्यक्ष डॉ. सतीश धामणकर, सचिव डॉ. हेमा पाटील, आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ सचिव डॉ. संतोश शिंदे आणि अन्य डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱयांना हे निवेदन दिले आहे.