प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना काळात दीडशेहून अधिक रुग्णांवर उपचार करणाऱया डॉ. अंजली चिकोडी यांचा माजी नगरसेवक पंढरी परब यांच्यातर्फे व सिद्धी महिला मंडळाच्या सहकार्याने सत्कार करण्यात आला. यावेळी ऍड. रतन मासेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर उपस्थित होते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तरुण भारतने नवदुर्गा या सदरामध्ये डॉ. अंजली चिकोडी यांच्या सेवेची नोंद घेतली. त्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात आला.
दक्षता हॉस्पिटलमध्ये शनिवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंढरी परब म्हणाले, डॉ. चिकोडी यांनी दक्षता हॉस्पिटलमध्ये 150 हून अधिक कोविड रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले, ही खूप महत्त्वाची बाब आहे. चांगल्या कार्याचा सत्कार होणे आवश्यक आहे, या हेतूने आम्ही हा सत्कार करत आहोत.
यावेळी सिद्धी महिला मंडळातर्फे सुनीता सुभेदार यांनी डॉ. चिकोडी यांचा सत्कार केला. मनीषा सुभेदार यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिले. नवदुर्गा सदरासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल मनीषा सुभेदार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हॉस्पिटलचे व्यवस्थापक संजीव, नेहा साबळे, नीशा अणवेकर, अश्विनी गोडसे आदी उपस्थित होते.