संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवर पाऊल टाकण्यास ‘इंडियन प्रीमियर लीग’ सज्ज होत असतानाच ‘व्हिवो’नं माघार घेतल्यानं ‘बीसीसीआय’समोर अचानक गुंता निर्माण झाला तो ‘टाइटल राइट्स पार्टनर’चा. ती उणीव भरून काढली ‘ड्रीम इलेव्हन’ या नावानं… कसलं आहे हे आस्थापन ?…
‘फॅटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म’ ‘ड्रीम इलेव्हन’नं मुसंडी मारलीय, बाजी मारलीय ती दिग्गजांचा पराभव करून, त्यांना नामोहरम करून…8 कोटींहून अधिक ‘युजर्स’ असल्याचा दावा करणाऱया त्या ‘टेक स्टार्टअप’ची स्थापना 2008 साली केली ती मुंबईतील दोन युवकांनी, हर्ष जैन व भावित सेठ यांनी…त्यांनी काही दिवसांपूर्वी भारतातील क्रिकेट विश्वाला अक्षरशः जबरदस्त धक्का दिलाय तो ‘इंडियन प्रीमियर लीग’चे ‘टाइटल हक्क’ खिशात घालून…‘ड्रीम इलेव्हन’नं (आयपीएल) गारद केलंय ते ‘ई-लर्निंग स्टार्टअप्स’ ‘बायजूस्’ नि ‘अनऍकॅडमी’सारख्या बलवान प्रतिस्पर्ध्यांना. विशेष म्हणजे सुरुवातीला जोरदार धडक दिलेल्या ‘टाटा सन्स’नं मात्र सर्वांची निराशा करण्याचं काम इमाने इतबारे पार पाडलंय…
अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे तिन्ही ‘प्लेयर्स’नी फलंदाजी केली ती ‘इंडियन टेक स्टार्टअप्स’ संघातून…‘टाइटल राइट्स पार्टनर’ ‘व्हिवो इंडिया’नं ‘आयपीएल’शी भारत व चीन यांच्यातील लडाखमधील संघर्षानंतर ‘घटस्फोट’ घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’नं (बीसीसीआय) संभाव्य बोलीदारांसाठी वापर केला तो ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (ईओआय) ‘अस्त्रा’चा…‘व्हिवो’नं 2018 ते 2022 दरम्यानच्या कालावधीसाठी ‘इंडियन प्रीमियर लीग’शी केला होता तो तब्बल 2 हजार 190 कोटी रुपयांचा (2018, 19 आणि 20 मध्ये चिनी मोबाईल कंपनीनं ‘बीसीसीआय’च्या तिजोरीत ओतले प्रत्येकी 440 कोटी रुपये)…‘ड्रीम इलेव्हन’नं 2020 मधील यंदाच्या 13 व्या आवृत्तीसाठी बाजी मारलीय ती 222 कोटी रुपयांच्या साहाय्यानं. पूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘व्हिवो’नं न परतण्याचा निर्णय घेतल्यास ‘ड्रीम इलेव्हन’च 2021 नि 2022 साली होणाऱया ‘आयपीएल’वर राज्य करेल असं म्हटलं होतं. परंतु आता नवीन वृत्तानुसार, विजेत्या आस्थापनाबरोबर यंदाच्या ‘इंडियन प्रीमियर लीग’पुरताच करार करण्याचं ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’नं ठरविलंय…‘बीसीसआय’नं येऊ घातलेल्या दोन मोसमांतल्या करारासंबंधी नंतर चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय. ‘ड्रीम इलेव्हन’ अन् ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ यांच्यातील करार 31 डिसेंबर, 2020 पर्यंत लागू असेल…
‘ड्रीम इलेव्हन’नं 2021 व 2022 साली प्रत्येकी 240 कोटी रुपये देण्याचं देखील मान्य केलं होतं. त्यामुळं ‘बीसीसीआय’च्या तिजोरीत तीन वर्षांत सरासरी भर पडली असती ती 234 कोटी रुपयांची…परंतु ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’नं एक ‘मास्टरस्ट्रोक’ मारलाय…‘बीसीसीआय’नं दोन अतिरिक्त अधिकृत भागीदारांची निवड केलीय आणि त्यांच्याकडून मिळणार दरवर्षी प्रत्येकी 40 कोटी रुपये (एकूण 80 कोटी)… त्यांच्यात समावेश ‘ई-लर्निंग स्टार्टअप’ ‘अनऍकॅडमी’ नि ‘फिनटेक कंपनी’ ‘क्रेड’ यांचा…13 व्या हंगामासाठी ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ला मिळणार एकूण 302 कोटी रुपयs. ‘बीसीसीआय’च्या मते, ‘व्हिवो’ देत असलेल्या रकमेपेक्षा हा आकडा बराच कमी असला, तरी ‘कोव्हिड-19’मुळं जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार केल्यास सध्या मिळत असलेली ‘स्पॉन्सरशिप’ निश्चित चांगली…‘बायजू’नं रक्कम वाढविल्यास मात्र सारं चित्र क्षणार्धात बदलू शकेल. ‘बायजू’नं ‘टाइटल’ हक्कांसाठी दरवर्षी 201 कोटी रुपये, तर ‘अनऍकॅडमी’नं 171 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं होतं…
चीनची बलाढय़ ‘गेमिंग’ कंपनी आणि भारतातील कित्येक ‘स्टार्टअप्स’मध्ये गुंतवणूक करणाऱया ‘टेनसेंट ग्लोबल’नं ‘ड्रीम इलेव्हन’ला सुद्धा धडक दिलीय… पण ‘बीसीसीआय’च्या मतानुसार, ‘ड्रीम इलेव्हन’ हे भारतातील आस्थापन, कारण त्याला जन्म दिलाय तो आपल्या देशातील युवकांनी. त्यामुळं काळजी करण्याची गरज नाहीये…दरम्यान, ‘ट्रेड ग्रुप’नं (सीएआयटी) चिनी गुंतवणूक असलेल्या कंपनीला पुन्हा एकदा ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये मुख्य स्थान दिल्याबद्दल आक्षेप घेतलाय अन् ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ला पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय…‘ड्रीम इलेव्हनला ‘आयपीएल’चं प्रायोजकत्व देताना भारतीयांच्या भावनांचा विचार करण्यात आलेला नाहीये. चीनविषयी देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात राग आहे हे विसरून चालणार नाही, पत्रातील ‘ट्रेड ग्रुप’चे शब्द…
या पार्श्वभूमीवर पुढं आलेल्या माहितीनुसार, निधी उभा करण्याच्या दृष्टीनं ‘ड्रीम इलेव्हन’ची चार खासगी ‘इक्विटी फर्म्स’शी चाललेली बोलणी बरीच पुढं पोहोचलीय. हा सौदा मार्गी लागल्यास पहिल्या टप्प्यात 35 दशलक्ष डॉलर्स अन् दुसऱया टप्प्यात शेअर्सच्या विक्रीतून 200 दशलक्ष डॉलर्स उभे केले जातील. त्यानंतर ‘टेनसेंट’चा कंपनीतील हिस्सा सध्याच्या 10.9 टक्क्यांवरून एकेरी आकडय़ात येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागलीय. मात्र प्रवर्तक जैन हे सर्वांत मोठे समभागधारक म्हणून कायम राहतील. या सौद्यानंतर ‘ड्रीम इलेव्हन’चं मूल्य उड्डाण करेल ते 2.5 अब्ज डॉलर्सवर…
सर्वांना आश्चर्याचा प्रचंड धक्का दिला तो मात्र ‘सॉल्ट-टू-स्टील’ म्हणून साऱया विश्वात प्रसिद्धी मिळविलेल्या ‘टाटा सन्स’नं, कारण त्यांच्यामुळं जोरदार शर्यतीचं दर्शन घडेल असं वाटलं होतं. परंतु ‘टाटा समूहा’नं माघार घेण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला… मिळालेल्या माहितीनुसार, ‘टाटा सन्स’नं प्रतिस्पर्ध्यांचा सुपडा अगदी शंभर टक्के साफ करण्याचं ठरविलं होतं, पण त्या विश्वविख्यात कंपनीच्या काही अटींमुळं साऱया मोहिमेचे अक्षरशः तीन तेरा वाजले… आस्थापनानं ‘टाइटल स्पॉन्सरशिप’च्या साहाय्यानं लक्ष केंद्रीत केलं होतं ते तीन वेगवेगळय़ा गटांवर म्हणजेच ‘टाटा समूहा’तील तीन ‘ब्रँड्स’वर. परंतु ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’नं हिरवा झेंडा दाखविला तो कुठल्याही एका ‘ब्रँड’ला. ‘टाटा सन्स’ला मंडळाचं वर्चस्व मान्य होणं शक्यच नव्हतं. मग सारं घडलं ते अपेक्षेनुसारच…‘टाटा’नं बोलीदारांच्या स्पर्धेत प्रवेश केल्यामुळं इतरांवर मात्र पाळी आली ती पळण्याची आणि त्याचा लाभ मिळाला तो ‘बीसीसीआय’ला…
अन्य एका घडामोडीनुसार, महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘बाय-बाय’ म्हटलेलं असलं, तरी त्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाहीये…विविध कंपन्यांनी त्याच्या दिशेनं, ‘कॅप्टन कूल’च्या दिशेनं पळणं थांबविलेलं नाही. ‘अमूल’, ‘इंडिगो’, ‘केएफसी’, ‘टीव्हीएस’, ‘मास्टरकार्ड’ सारख्या वेगवेगळय़ा क्षेत्रांतील ‘ब्रँड्स’ना तो अजून देखील अव्वल वाटतोय…‘इंडिगो’नं एका जाहिरातीत म्हटलंय : ‘दि हेलिकॉप्टर हॅज डेड’…‘फास्ट फूड’ क्षेत्रातील अजस्त्र आस्थापन ‘केएफसी’नं भाजलेल्या ‘चिकन’च्या ‘बकेट’वर लिहिलंय : ‘दि ग्रेटेस्ट फिनिशर’…‘झोमॅटो’नुसार ‘इट हॅड कम्फर्ट फूड इफ ऍनी वन नीडेड इट बिलो ऍन इमेज ऑफ ए नंबर सेव्हन जर्सी’… ‘पेटीएम’ व ‘गो एअर’सारख्या ‘ब्रँड्स’नी सुद्धा संधी गमावलेली नाहीये…एका विश्लेषकाच्या मते, ‘कोरोनामुळं सध्या भारतातील क्रीडाक्षेत्रात विशेष असं काहीही घडलेलं नाही आणि त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न ‘ब्रँड्स’नी केलाय. त्याचं ‘ग्लॅमर’ कमी झालेलं नाहीये’…
महेंद्रसिंग धोनी निवृत्त झालाय, पण कंपन्यांना त्याच्याबरोबर जाणं, त्याच्याशी संबंध जोडणं येऊ घातलेल्या दिवसांत सुद्धा खात्रीनं आवडणार. सचिनच्या वेळीही नेमकं असंच घडलं होतं…2019 सालच्या इंग्लंडमधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत भारतानं मार खाल्ल्यानंतर देखील धोनींचं ‘ब्रँड’ मूल्य 41.2 दशलक्ष डॉलर्सपर्यंत झेपावलं होतं…येऊ घातलेल्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये जेव्हा झारखंडचा हा जिगरबाज खेळाडू ‘चेन्नई सुपरकिंग्स’तर्फे मैदानाला धडक देईल तेव्हा साऱयांचं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते त्याच्यावरच. ‘डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन’नुसार भारताच्या माजी कर्णधारानं 2018 मध्यs झेप घेतली ती नवव्या स्थानावर (ब्रँड रँकिंग्स). त्यावेळी सचिन तेंडुलकरवर 25 दशलक्ष डॉलर्ससह 15 व्या स्थानावर समाधान मानण्याची पाळी आली होती, तर सध्याचा कर्णधार विराट कोहलीनं तब्बल 238 दशलक्ष डॉलर्स ‘ब्रँड मूल्या’सह पटकावला होता प्रथम क्रमांक…आता धोनी नि ‘ड्रीम इलेव्हन’ यांच्यात संबंध तो काय ? 39 वर्षांचा हा खेळाडू त्यांचा ‘ब्रँड ऍम्बॅसिडर’च राहिलेला नाही, तर त्यानं अतिशय हुशारीनं ‘कार्स 24’बरोबर गुंतवणूक करून ठेवलीय ती ‘ड्रीम इलेव्हन’मध्येही !
– राजू प्रभू