क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेतील दुसरी उपान्त्य लढत आज बुधवारी एफसी गोवा आणि बेंगलोर एफसी यांच्यात होईल. कोलकातातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर हा सामना संध्याकाळी 6 वाजता खेळविण्यात येईल.
130व्या डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेचा यंदाचा प्रबळ दावेदार म्हणून एफसी गोवा आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या एफसी गोवाच्या मुहाम्मद नेमील आणि देवेंद्र मुरगावकर यांच्यावर प्रतिस्पर्धी बेंगलोर एफसीच्या बचावफळीचे लक्ष असेल. या दोघांनीही या स्पर्धेत प्रत्येकी चार गोल केले आहेत.
बेंगलोर एफसीने या स्पर्धेत आपल्या युवा फुटबॉलपटूंना संधी दिली आहे. आपल्या अनुभवी फुटबॉलपटूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱया बेंगलोर एफसीने आतापर्यंत आपल्या प्रतिस्पर्धी संघांना चांगली झुंज दिली असून सन्मानाने स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्यांच्या लियो आगुस्तिन आणि नाम्ग्याल भुतियाचा खेळ उच्च दर्जाचा झाला आहे. स्पर्धेत एफसी गोवा आणि बेंगलोर एफसीने लीगमध्ये आपआपल्या गटात अग्रस्थान मिळविले. उपान्त्यपूर्व सामन्यात एफसी गोवाने दिल्ली एफसीचा 5-1 तर बेंगलोर एफसीने आर्मी ग्रीनचा पराभव करून उपान्त्य फेरी गाठली होती.