सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाबरोबरच मानसिक ताणतणावांचा सामनाही देशातील असंख्य लोकांना करावा लागत आहे. त्यामुळे मनस्वास्थ्य सुधारणे हे वैद्यक शास्त्रासमोरील आव्हान म्हणून उभे राहिले आहे. ऍलोपथिक औषधांबरोबरच वनस्पतीजन्य आणि नैसर्गिक उपायांचा उपयोगही तणावमुक्तीसाठी केला जात आहे. योगसाधना, प्राणायाम, हलका व्यायाम यांच्याबरोबरच आता सिंगोनियम या वनस्पतीकडेही संशोधकांचे लक्ष वेधले गेले आहे.
ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील असल्याचे सांगितले जाते. अधिक पावसाच्या जागी तिची वाढ चांगली होते. या वनस्पतीच्या 30 हून अधिक प्रजाती आहेत. हवेचे शुद्धीकरण करण्याची त्याची नैसर्गिक क्षमता आहे. हवेतील विषारी वायू शोषून घेण्याचे कार्य ही वनस्पती करते. कोणत्याही मातीत आणि कोणत्याही हवामानात उगवणारी ही वनस्पती तणावमुक्तीसाठी निर्माण केलेल्या औषधांमध्ये उपयोगात आणली जाते. या वनस्पतीचा रस, देठ आणि पान या सर्वांपासून तणावमुक्तीची औषधे बनविली जाऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या काळात या रोपांना मागणी वाढल्याचे दिसून येते.